सांगलीच्या रक्तातच बंड आहे, ते यशस्वी करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वाची आहे असे सांगत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष इशारा दिला. तसंच, काँग्रेस उमेदवरी देईल अशी आशा व्यक्त केली असली तरीही त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“विशाल पाटलांवर काय अन्याय झालाय, हे फक्त त्यांचा संघर्ष माहित असलेल्यांनाच ठाऊक आहे. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले ह्याचा विचार होणे गरजेचे आहे. राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे, असं सत्यजीत तांबे म्हणाले.

हेही वाचा >> सांगलीत विशाल पाटीलांमुळे ठाकरे गटाची कोंडी

“वसंतदादा पाटलांचे ह्या महाराष्ट्रावर व आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत, विशेषतः त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज घराघरात डॉक्टर, इंजीनियर तयार होत आहेत. विशालदादा हे वसंतदादांच्या कामाचा वसा व वारसा पुढे घेऊन जाण्यात पूर्णपणे सक्षम आहेत. त्यामुळेच त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, विशालदादांना कुठेतरी संधी मिळायलाच हवी”, असंही ते म्हणाले.

विशाल पाटलांची गेल्या तीन वर्षांपासून मोर्चेबांधणी

विशाल पाटील लोकसभेसाठी गेल्या तीन वर्षापासून प्रयत्न करत आहेत. करोनाचे संकट असो वा सांगलीला वेढणारा महापूर असो अशा संकट काळात टीम विशाल नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरली होती. गेल्या एक वर्षापासून तर डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर पदयात्रा काढून जागृती करण्यात काँग्रेस आघाडीवर होती. गावपातळीपासून ते महापालिकेपर्यंत काँग्रेसचे अस्तित्व आहे. थेट सरपंच निवडणुकीत याचे प्रतिबिंब पाहण्यास मिळाले होते.

हेही वाचा >> सांगलीच्या रक्तातच बंड, आता माघार नाही – विशाल पाटील

सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा नैसर्गिक हक्क

सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा नैसर्गिक अग्रहक्क असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला दिली गेली. शिवसेनेनेही चंद्रहार पाटील यांना पक्षात घेउन उमेदवारीही जाहीर केली. यानंतरच खर्‍या अर्थाने विशाल पाटील यांना उमेदवारीपासून वंचित ठेवण्यामागे काही शक्ती कार्यरत असल्याची चर्चा जोरदारपणे सुरू झाली. यात समझोता करण्याऐवजी शिवसेना नेते संजय राउत यांच्या बोलण्यांने आगीत तेल ओतण्याचेच काम केले. जुळू पाहणारे स्नेहबंध पुन्हा विस्कटले. आणि त्या चिडीतून विशाल पाटील यांच्यावर उमेदवारी दाखल करण्यासाठी दबाव आला. आताही त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल करत असताना अपक्ष म्हणूनही उमेदवारी दाखल केली आहे. जर शिवसेनेने जागा सोडलीच नाही, आणि काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढतीला सहमती दर्शवली नाही तर मैदानात उतरायचेच या हेतूने अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे सांगलीत कोणत्याही स्थितीत विशाल पाटील मैदानात असणार हे स्पष्ट आहे.