कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाची उघडीप राहिली. पंचगंगा नदीची पाणीपातळी किंचित घटली आहे. तर, वारणा – कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली आहे. कोल्हापुरात आज पंचगंगा नदीची पाणीपातळी घटली. काल दुपारी चार वाजता राजाराम बंधारा येथून ३९ हजार ४१४ क्युसेक विसर्ग होत होता. आज तो ३५ हजार २७८ इतका कमी झाला आहे. आज दुपारी तीन वाजता पाण्याखालील बंधाऱ्यांची संख्या ५५ होती. ती पुढील दोन तासांत झपाट्याने कमी होऊन ४७ इतकी झाली आहे.

मांगले बंधारा पुन्हा पाण्याखाली

गेल्या आठवड्यात पावसाने जोर धरल्याने वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, पन्हाळा तालुक्यातील सावर्डे-मांगले येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दुसऱ्यांदा पुराच्या पाण्याखाली गेला आहे. त्यावरून होणारी कोल्हापूर-सांगली या दोन्ही जिल्ह्यांतील वाहतूक बंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे चांदोली, राधानगरी, काळम्मावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली होती.

कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेने वाहत आहे. ५५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान कोल्हापूर शहराच्या मळे भागात काल पुराचे पाणी घुसले होते. उत्तरेश्वर पेठ, शिंगणापूर जुना नाका व प्रबुद्ध भारत कॉलनी येथील रस्त्यावर पहाटे पुराचे पाणी आले आहे. सावधगिरीचा भाग म्हणून येथे लोखंडी कठडे लावून मार्ग बंद करण्यात आला आहे. कोयना, चांदोली धरणातील पाण्याच्या विसर्गमुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगेच्या पुराच्या पाण्यात दिवसभरात तीन फुटाने वाढ झाली आहे. पुराचे पाणी वाढल्याने नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरास पुराच्या पाण्याचा पुरता वेढा पडला असून निम्म्याहून अधिक मंदिर पाण्याखाली गेले आहे.