गेली दहा वर्षे पाटबंधारे व संबंधित खाती तुमच्याच पक्षाच्या हातात आहेत. सिंचनावर आतापर्यंत ७० हजार कोटी खर्च झालेत. मग महाराष्ट्रात दुष्काळ पडलाच कसा, असा प्रश्न विचारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी शरद पवार यांना लक्ष्य केले. महाराष्ट्र दौऱयाच्या दुसऱया टप्प्याला राज ठाकरे यांनी सोलापूरमधून सुरुवात केली.
सोलापूरच्या नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर झालेल्या सभेला सोलापूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी अजित पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्यावर शेलक्या शब्दांत हल्ला केला.
ते म्हणाले, दुष्काळ अचानक येत नाही. तो भूकंप किंवा पूरासारखा नाही. दुष्काळ पडणार असल्याचे अगोदरच कळते. दुष्काळाची कल्पना होती, तर त्याचे नियोजन का केले नाही. आज महाराष्ट्रातील ४४ हजार गावांपैकी सहा हजार गावांत दुष्काळ आहे. मार्च, एप्रिलमध्ये हा आकडा वाढतच जाणार आहे. आमच्याकडे पाणी नाही आणि नियोजन नाही. बोअर काढण्यासाठी सर्वाधिक गाड्या या तामिळनाडूतून आल्या आहेत. एकट्या लातूरमध्ये महिन्याला चार हजार बोअर खणल्या जाताहेत. बोअर खणण्यासाठी लागणारा पैसाही तामिळनाडूमध्येच जातोय. सिंचनावर ७० हजार कोटी रुपये खर्च करून आपल्यावर ही वेळ का आलीये. एकीकडे सामान्यांच्या गुरांसाठी चारा नाही आणि दुसरीकडे मंत्र्यांची शेतं मात्र हिरवीगार आहेत.
… अजून किती दिवस काकांच्या जीवावर जगणार
राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर जहाल शब्दांत टीका केली. ते म्हणाले, वय वर्षे ५२ झाले, तरी अजून काकांच्या जीवावर जगताय. घरच्यांच्या जीवावर जगण्याचे एक वय असते. काकांनी हात काढले, तर पानपट्टीवाला तरी विचारेल का यांना. मध्यंतरी अजित पवारांनी मोठे बंड केले. मग काकांनी डोळे वटारल्यावर हात मागे बांधून काकांची माफी मागितली. दोन महिने बिनखात्याचे मंत्री होते. पहिल्यांदा मोठे बंड केले. आमदार पाठिशी येतील असे वाटले. एक आमदार पाठिशी आला नाही.
मोदींच्या आंघोळीचे दोन-दोन चमचे पाणी प्या
मुख्यमंत्री आणि इतर मंत्री हे राज्याचे विश्वस्त असले पाहिजेत. मात्र आमच्याकडे हे सगळे मालक बनले आहेत. उजनीचे पाणी सोलापूरला मिळत नाही. मात्र, ते बारामतीतील डायनामिक्स डेअरीसाठी सोडले जाते. हे कसले राजकारण, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. विकास कसा करायचा हे खरंच गुजरातमध्ये जाऊन बघितले पाहिजे. आमच्या मंत्र्यांनी मोदींच्या आंघोळीचे दोन-दोन चमचे पाणी प्यायला पाहिजे, असाही टोला त्यांनी लगावला.
नितीशकुमारांचे कौतुक
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे कौतुक केले. बिहारमध्येही आता प्रगती होऊ लागली असल्याचे सांगून ते म्हणाले, नितीशकुमारांना मानले पाहिजे. पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यावेळी त्यांनी बिहारमधील सुमारे ५० हजार गुन्हेगारांना अटक केली. तिथल्या जनतेला तेच मोठे समाधान होते. गुंडांना न घाबरता घरातून बाहेर पडता येऊ लागल्याचे त्यांना मोठे समाधान वाटले.
शिंदेंनी दलितांसाठी काय केले
सुशीलकुमार शिंदे हे कायम आपण दलित घरातून आल्याचे सांगत असतात. पण त्यांनी दलितांच्या विकासासाठी काय केले, याचे उत्तर द्यावे, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.