Pahalgam Terror Attack Updates : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान महाराष्ट्रातील अनेक नागरिक तिथे उपस्थित होते. त्यामुळे या पर्यटकांनी तेथील थरार आँखोदेखी पाहिला आहे. महाराष्ट्रात परतल्यावर त्यांनी त्यांच्या अनुभवांचे कथन केले आहे. नवी मुंबई येथे राहणारे सुबोध पाटील यांनीही त्या घटनेचा थरार ANI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. गोळीबाराचा आवाज ऐकताच आम्ही खाली जमिनीवर झोपलो. गोळी चाटून गेल्याने बेशुद्ध पडलो होतो, पण जाग आली तेव्हा आजूबाजूला मृतदेह पडलो होते, असं ते म्हणाले.

सुबोध पाटील म्हणाले, “पाठून आवाज आला. कसला आवाज आहे, हे आम्हाला आधी कळलं नाही. आम्ही मागे वळून पाहिलं तेव्हा लोक धावत होते. म्हणून आम्हीही घाबरलो होतो. काही लोक खाली झोपले. मग आम्ही खाली झोपलो. एक दहशतवादी आला, त्याने विचारलं हिंदू कोण आहे. आम्ही सर्व घाबरलो होतो. त्याने गोळीबार सुरू केला आणि मारू लागला. त्याने झाडलेली एक गोळी माझ्या मागून गेली, त्यामुळे मी बेशुद्ध झालो.”

ते पुढे म्हणाले “मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेह पडले होते. मी शुद्धीवर आल्याचं तेथील एका स्थानिकाने पाहिलं. त्याने मला पाणी दिलं आणि मला त्याच्या पाठीवर बसवून बाहेर आणलं. बाहेर बाईकवरून त्याने मला हॉस्पिटलला नेलं. तिथे प्रथोमपचार करून हेलिकॉप्टरमध्ये बसवून लष्करी हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे मी सात दिवस दाखल होतो.”

भारताकडून पाकिस्तानवर अनेक निर्बंध

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर या घटनेत अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासह सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला होता. तसेच पाकिस्तानी विमानांसाठी भारताने आपलं हवाई क्षेत्र बंद करण्याचाही निर्णय घेतला.

यानंतर आता भारताने पाकिस्तानच्या विरोधात आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे