Vaishnavi Hagawane Death Case Updates : पुण्यातील मूळशी या ठिकाणी राहणाऱ्या वैष्णवी शशांक हगवणेने १६ मे च्या शुक्रवारी म्हणजेच मागील शुक्रवारी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मुळशीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे चर्चेत आले आहेत. वैष्णवी ही राजेंद्र हगवणेंची सून होती. राजेंद्र हगवणे मागील शुक्रवारपासून फरार होते. त्यांच्यासह त्यांचा मुलगा सुशीलही होता. कोण आहेत राजेंद्र हगवणे आपण जाणून घेऊ.
राजेंद्र हगवणे यांना पहाटे साडेपाचच्या सुमारास अटक
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना शोधण्यासाठी गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याच्या एकूण आठ टीम त्यांच्या मागावर होत्या. या प्रकरणात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे स्वतः लक्ष ठेवून होते. आवश्यक त्या सूचना देत होते. प्रत्येक वेळी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा लोकेशन बदलत असल्याने त्यांना पकडणं अवघड होत. अखेर त्यांना आज स्वारगेट मधून साडेपाचच्या सुमारास अटक करण्यात आली.
राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी
राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मुळशीचे तालुकाध्यक्ष होते. वैष्णवीच्या आत्महत्येचं प्रकरण समोर येताच अजित पवार यांनी त्यांची हकालपट्टी केली. राजेंद्र हगवणेंनी २००४ मध्ये मुळशी या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. वैष्णवीच्या आत्महत्येचं प्रकरण समोर आल्यावर राजेंद्र हगवणे यांची पक्षाने हकालपट्टी केली.
कोण आहेत राजेंद्र हगवणे?
राजेंद्र हगवणे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीचं सदस्यत्व होतं.
राजेंद्र हगवणेंनी २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. असं असलं तरीही त्यांना त्या निवडणुकीत ६१ हजारांहून अधिक मतं मिळाली होती.
राजेंद्र हगवणे यांचा मूळशी भागात राजकीय दबदबा होता, शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार या सगळ्यांचेच निकटवर्तीय म्हणून राजेंद्र हगवणे ओळखले जात होते.
वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे यांनी कसा आणि कुठे पळ काढला?
वैष्णवीने मागच्या शुक्रवारी आत्महत्या केली. औंध येथील रुग्णालयात तिला नेण्यात आलं होतं. औंधच्या रुग्णालयात राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा फोर्ड गाडीने रुग्णालयात आले होते. वैष्णवीचा मृतदेह पाहिल्यावर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटकेची भीती वाटली. त्यांनी महिंद्रा थार गाडी मागवली आणि वडगाव मावळच्या दिशेने फरार झाले. त्यानंतर पवना डॅम या ठिकाणी असलेल्या फार्महाऊस राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील गेले. इथेही पोलीस येऊ शकतात म्हणून राजेंद्र हगवणेंनी ते फार्म हाऊसही सोडलं. त्यानंतर ते आळंदीतल्या एका लॉजमध्ये गेले. १८ मे रोजी म्हणजेच वैष्णवीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी राजेंद्र हगवणेंनी मित्राची मारुती सुझुकी बॅलिनो घेतली आणि पुन्हा पवना डॅम भागात आले. त्यानंतर १९ मे चया दिवशी सातारा येथील खटाव या ठिकाणी ते गेले आणि मित्राच्या फार्म हाऊसवर थांबले. १९ ते २१ मे या कालावधीत राजेंद्र हगवणे हे बेळगावमधल्या हेरिटेज रिसॉर्टलाही थांबले होते. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या एका मित्राच्या फार्महाऊसवर पळाले. २२ मे रोजी पुण्यातील मुहुर्त लॉन्स या ठिकाणी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील आले. तिथलं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं. ज्यानंतर २३ मे च्या पहाटे पोलिसांनी त्यांना अटक केली.
राजेंद्र हगवणेंच्या कुटुंबात कोण कोण?
राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी लता, मुलगी करीश्मा, मुलगा सुशील आणि शशांक तर सुना मयुरी आणि वैष्णवी यांचा समावेश आहे. त्यातल्या वैष्णवीने तिचं आयुष्य संपवलं आहे. दरम्यान या प्रकरणात फरार झालेल्या राजेंद्र हगवणेंना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीत काय काय समोर येतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे. वैष्णवीचा छळ सासरच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणावर होत होता. ती जेव्हा गरोदर होती तेव्हा तिला उन्हात उभं करण्यात आलं होतं असे सगळे आरोप हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरीने केले आहेत.
पोलीस राजेंद्र हगवणेंच्या मागावरच होते
वैष्णवीचा सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं तयार करण्यात आली होती. यातील काही टीम्स दोघांचा शोध घेण्यासाठी परराज्यात देखील जाऊन आल्या. मात्र दोघांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. त्यांनी सुशील हगवणेच्या काही मित्रांची उचलबांगडी केली. त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली. ज्यानंतर शुक्रवारी पहाटे राजेंद्र हगवणे आणि सुशील या दोघांना पोलिसांनी अटक केली.
वैष्णवीच्या वडिलांचा राजेंद्र हगवणे आणि शशांक यांच्यावर आरोप काय?
वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा नवरा शशांक आणि सासरे राजेंद्र हगवणे यांनी आर्थिक कारणांमुळे तिला मारहाण केली. एकदा तिच्या वडिलांनी विचारले, “वैष्णवीच्या अंगावर इतक्या जखमा कशा?” यावर राजेंद्र आणि शशांक म्हणाले, “आधीच सांगितलं होतं, आम्हाला पैसे पाहिजेत. तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायचं? म्हणूनच तिला मारून टाकलं.” जावयाचे हे शब्द वडिलांचं काळीज चिरत गेले. सासरच्यांकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा पती शशांक याला राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आलं आहे. वैष्णवीचे सासरे पक्षाचे पदाधिकारी नाहीत. गुन्हेगारांना आम्ही पाठीशी घालणार नाही, अशी माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली. वैष्णवी हगवणेचा मृत्यू दुर्दैवी आहे. याबाबत आमच्याकडे कोणतीही तक्रार नसताना स्वतः दखल घेऊन आम्ही याप्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. वैष्णवी हगवणेचे सासरे पक्षाचे पदाधिकारी नाहीत. वैष्णवीचे पती आमच्या पक्षाचे सदस्य होते मात्र त्यांना आम्ही निलंबित केले आहे अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी गुरुवारी दिली होती.