पुणे : दररोज हजारो विद्यार्थी दुचाकीवरून प्रवास करतात. त्यामुळे हेल्मेटचा वापर ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक बाब आहे. रस्ता सुरक्षा ही केवळ वैयक्तिक नाही, तर सामूहिक जबाबदारी आहे. स्वयंशिस्त हीच खरी सुरक्षा’ हा संदेश आपण सर्वांनी मनात ठेवावा, असे आवाहन हेल्मेटमॅन ऑफ इंडिया अशी ओळख असलेल्या राघवेंद्र कुमार यांनी केले.

राघवेंद्र कुमार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सदिच्छा भेट देऊन विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी रस्ता सुरक्षा आणि हेल्मेट वापर या विषयांवर संवाद साधला. प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, लेफ्टनंट कर्नल विवेक तिवारी, सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल मोहित गौर, जॉबिझाचे संस्थापक डॉ. गौरव शर्मा, आयटी व्यावसायिक पवनकुमार द्विवेदी या वेळी उपस्थित होते. राघवेंद्र कुमार हे भारतीय लष्कर आणि नौसेना मुख्यालय येथे येथे ‘रोड सेफ्टी ब्रँड ॲम्बेसिडर’ म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या ‘मिशन सेफ इंडिया’ अंतर्गत देशातील २४ राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि कंपन्यांमधून जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. तसेच त्यांनी आयोजित केलेल्या ‘सुरक्षा यात्रा’, ‘सेवाक्रांती अभियान’ आणि ‘शिव शिष्य परिषद’अशा उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. राघवेंद्र कुमार यांच्या कार्याची दखल अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी घेण्यात आली आहे.

रस्ता सुरक्षा आणि हेल्मेट वापराच्या मोहिमेबाबत सिंह म्हणाले, ‘२०१४ मध्ये ग्रेटर नोएडामध्ये त्यांच्या एका जिवलग मित्राचा अपघातात मृत्यू झाला होता. त्या वेळी त्याने हेल्मेट घातलेले नव्हते. या घटनेने प्रेरित होऊन हेल्मेट वितरण आणि रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम सुरू केली. आजपर्यंत २२ राज्यांमध्ये सुमारे ७५ हजार हेल्मेट मोफत वाटले असून, देशभरात रस्ता सुरक्षिततेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.विद्यार्थ्यांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांमधून प्रेरणा घ्यावी आणि रस्ता सुरक्षा हा स्वतःचा संकल्प मानावा, असे डॉ. काळकर यांनी सांगितले.