Maharashtra Budget Session 2024 : मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिलेलं असतानाही मनोज जरांगे पाटील ओबीसीतील आरक्षणासाठी आग्रही आहेत. तसंच, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही दोषारोप केले. हा मुद्दा आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रचंड गाजला. विधानसभा आणि विधान परिषदेत खडाजंगी झाली. तर, मनोज जरांगेंच्या आंदोलनाची चौकशीकरता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

“मनोज जरांगे पाटंलांनी स्पेसिफिक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले आहेत. गेल्या दोन महिन्यात त्यांनी कधी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही आरोप केले नाहीत. पण फक्त फडणवीसांवरच आरोप का केले, याची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या बोलण्यावरून आजही वाटतं की त्यांचा फडणवीसांवर कमी-जास्त विश्वास असू शकतो”, असं अंबादास दानवे म्हणाले.

हेही वाचा >> मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार; भाजपाच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्षांचे आदेश

“आम्हीही चौकशीची मागणी करतोय. आम्ही चौकशीला नाही म्हणालो नाही. मनोज जरांगेंनी ज्यांची ज्यांची नावे घेतली त्यांचे फोन कॉल चेक करा. कोणाकोणाचे फोन आले, त्यांचे जे जे सहकारी इथे तिथे जातात ते कोणा कोणाला भेटले, त्यांनी कोणा-कोणाला फोन केले, याचीही चौकशी करा. जरा एसआयटीची कक्षा मोठी करा. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आदर केला पाहिजे. कारण, मनोज जरांगेंचं आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न होतो”, असंही ते म्हणाले.

हेही वाचा >> मराठा आरक्षणावर बोलताना एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “हा एकनाथ…”

मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार

मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून विधानसभेत आज खडाजंगी झाली. आशिष शेलार यांनी हा मुद्दा उचलून धरला. तर विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांच्या टीकेवर पलटवार केला. दरम्यान, या आंदोलनाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी आशिष शेलार यांनी लावून धरली. त्यामुळे या आंदोलनाची एसआयटी चौकशी होण्याकरता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आदेश दिले आहेत.