अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षातून बंडखोरी केली आहे. शिक्षक व पदवीधर निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी करत नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत सत्यजीत तांबे निवडूनही आले. आमदार झाल्यानंतर सत्यजीत तांबे पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान परिषदेत दाखल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी त्यांनी आपली भावी वाटचाल कशी असेल? यावर भाष्य केलं आहे. तसेच बंडखोरीनंतर भाजपानं त्यांना ऑफर दिली होती, या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना सत्यजीत तांबे म्हणाले, “हे पाहा… मी अपक्ष आमदार आहे आणि मी अपक्षच राहणार. परिस्थितीनुसार जसे-जसे प्रश्न येत राहतील, त्याप्रमाणे निर्णय घेतला घेईन,” असं विधान सत्यजीत तांबे यांनी केलं.

हेही वाचा- ‘२०२४ मध्येही तुम्हीच मुख्यमंत्री असणार का?”; एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

पुढील वाटचाल कशी असेल? काँग्रेस पक्ष कार्यालयातून तुम्हाला फोन वगैरे आले होते का? नाना पटोले किंवा पक्षश्रेष्ठींकडून मनधरणी करण्यात आली का? असं विचारलं असता सत्यजीत तांबे यांनी थेट उत्तर देणं टाळलं. “सगळ्यांचेच निरोप आहेत. सगळ्यांचेच आशीर्वाद आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच मी इथपर्यंत पोहोचलोय,” अशी प्रतिक्रिया सत्यजीत तांबे यांनी दिली. पुढे तुमच्या मनात काय आहे? असं विचारलं असता सत्यजीत तांबे म्हणाले, “माझ्या मनातलं योग्यवेळी सांगेन.” तांबेंच्या या विधानामुळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा- “सत्तांतर घडवण्यासाठी खरंच २००० कोटींचा सौदा झाला?”, एकनाथ शिंदे म्हणाले, “४० आमदार…”

विधान परिषेदत ‘या’ मुद्द्यांवर मांडणार भूमिका

“आज माझा पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी तुम्ही मला मोठमोठे प्रश्न विचारत आहात. जी माझी भूमिका असेल ती निश्चितपणे मांडण्याचा प्रयत्न करेन. आज राज्यात अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जुन्या पेन्शन योजनेवरून फार मोठा उद्रेक झाला आहे. औद्योगिक विकास जो राज्यात सुरू आहेत, त्याचा समतोल कसा साधला जाईल. सगळ्या विभागात कशा पद्धतीने औद्योगिक विकास होईल आणि त्यातून रोजगार निर्मिती कशी होईल? असे सगळे प्रश्न मला विधान परिषदेत मांडायचे आहेत,” असंही सत्यजीत तांबे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will satyajeet tambe join congress party again nana patole assembly council rmm