सातारा: फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा पोलीस आणि सायबर विभागाच्या यंत्रणा एकत्रित तपास करत आहेत. महिला आयोग देखील या तपासावर लक्ष ठेवणार असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली. दरम्यान प्राथमिक शवविच्छेदन अहवाल आला असून यानुसार ही आत्महत्या असल्याची माहितीही चाकणकर यांनी या वेळी दिली.
फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. यावर विविध राजकीय पक्षांनीही आंदोलने सुरू केली असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी आज फलटण उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार जोशी व अनेक जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यानंतर पत्रकार परिषद घेत महिला आयोगाची देखील या विषयीची भूमिका मांडली.
चाकणकर म्हणाल्या, की मागील काही महिन्यांपासून फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि फलटण ग्रामीण आणि शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी -कर्मचाऱ्यांमध्ये काही वाद होते. डॉक्टरांनी सुरुवातीला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने महिला डॉक्टरांची जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ महिला डॉक्टरांच्या समितीमार्फत चौकशी देखील सुरू होती.
या चौकशीमध्ये पोलीस यंत्रणा आणि महिला डॉक्टरांमध्ये आरोपी रुग्णालयात तपासणीसाठी आणण्याच्या वेळा आणि मागणीप्रमाणे तपासणी अहवाल (फिट आणि अनफिट) देण्याबाबत काही तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने त्यांना आपल्या कामाच्या जबाबदारीबाबत अवगत करण्याबाबतचा अहवाल डॉक्टरांच्या समितीने दिला होता. सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदाने यांच्याशी काही कामाच्या अनुषंगाने संपर्क झाला होता. नंतर त्यांच्यामध्ये कोणताही संपर्क झालेला नसल्याचे आढळून येत आहे. मात्र त्यांच्या भ्रमणध्वनीवरील तपशील तपासल्यानंतर याबाबत त्या दोघांचे कोठेही एकत्रित ‘लोकेशन’ मिळते आहे का, ते तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
रुग्णालयात काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांशी आपण चर्चा केल्याचे सांगत चाकणकर म्हणाल्या, की संबंधित महिला डॉक्टरांचे सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांबरोबर चांगले वर्तन होते. त्या एकत्रित जेवण, सहलीला जात होत्या. पोलिसांकडून दबाव येत असल्याबाबत त्यांनी सहकारी डॉक्टरांना काहीही माहिती दिलेली नव्हती, अशी माहितीही चाकणकर यांनी दिली. या सर्व प्रकरणाच्या तपासावर महिला आयोगाचे लक्ष आहे. पोलिसांच्या सर्व यंत्रणा एकत्रित तपास करत आहेत. तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली.
घटनेच्या दिवशी वाद
संबंधित महिला डॉक्टर या प्रशांत बनकर यांच्या घरी ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहत होत्या. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महिला डॉक्टर आणि बनकर कुटुंबीयांनी एकत्रित दिवाळी साजरी केली असून याची छायाचित्रेदेखील काढली आहेत. यामध्ये त्यांचे छायाचित्र आढळून आले नाही. त्यामुळे त्या नाराज होत्या. त्यातून प्रशांत बनकर आणि महिला डॉक्टरांमध्ये काही संदेशांची देखील देवाण-घेवाण झाली होती, अशी माहिती चाकणकर यांनी दिली. यानंतर या संदेशामध्ये महिला डॉक्टरने ‘मी आत्महत्या करेन’ अशी धमकी बनकर याला दिली होती. यावर बनकर याने ‘आपण चार-पाच वेळा आत्महत्या करण्याची धमकी दिलेली आहे, आपण असे करू शकत नाही’ असा संदेशही पाठवला आहे. या सर्व संदेश आणि डॉक्टरांच्या तक्रारी या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली.
बदलीनंतरही फलटणचा आग्रह
घटनेच्या दिवशी संबंधित महिला डॉक्टरांचा बनकर कुटुंबीयांबरोबर वाद झाला होता. या वेळी त्या त्यांचे घर सोडून एका मंदिरामध्ये थांबल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांची समजूत घालून त्यांना पुन्हा घरी पाठवले होते. मात्र रात्री पुन्हा त्यांनी बनकरांचे घर सोडले आणि त्या हॉटेलवर येऊन राहिल्या. त्यानंतरही प्रशांत बनकर आणि या महिला डॉक्टरांमध्ये संदेशाची देवाण-घेवाण झाल्याचे दिसून येते. या संदेशाच्या अनुषंगाने सर्व पातळीवर तपास सुरू आहे. महिला डॉक्टरांची तीन ते चार वेळा फलटण येथून बदली झाली होती. मात्र या सर्व वेळी त्यांनी पुन्हा फलटण उपजिल्हा रुग्णालयातच नेमणूक मागून घेतली होती. यावेळीही त्यांची बदली झाली होती. मात्र त्यांनी पुन्हा फलठणसाठी प्रयत्न केले. यातूनच विशेष (स्पेशल) आदेश काढून त्यांची पुन्हा फलटण उपजिल्हा रुग्णालयात नेमणूक करण्यात आली होती. अशी माहितीही चाकणकर यांनी दिली.
