Siddhant Sanjay Shirsat News: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेकडून शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आणि फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. मात्र आरोपानंतर काही तासांत सदर महिलेने सर्व आरोप मागे घेतले आहेत. तसेच हे आमच्यातील वैयक्तिक प्रकरण असल्याचे सांगून या वादावर आता पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

एबीपी माझा वृत्तवाहिनीशी सदर महिलेने संवाद साधून सविस्तर भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, “मी नोटीस पाठवली होती, मात्र आता हा विषय मला इथेच थांबवायचा आहे. मला कुणावरही कारवाई करायची नाही. सदर प्रकरण माझा वैयक्तिक विषय होता. माझ्या वैयक्तिक विषयाचे राजकारण होत आहे. त्यामुळे मी पाठवलेली नोटिसही परत घेत आहे. मला कुणावरही आरोप करायचे नाहीत.”

“नोटीस मागे घेण्यासाठी माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. हा निर्णय सर्वस्वी माझा आहे. सदर विषय माझा वैयक्तिक आणि कौटुंबिक विषय होता. पण समाज माध्यमातून त्याची इतकी चर्चा होईल आणि विरोधक विषय उचलून धरतील, असे मला वाटले नव्हते. तसेच काही लोक फोटोही शेअर करत आहेत. त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार”, असेही सदर महिलेने वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

संजय शिरसाट यांचा काही संबंध नाही

सदर प्रकरणामुळे राज्याचे मंत्री संजय शिरसाट वादात अडकतील की काय? अशी शक्यता होती. मात्र या प्रकरणाशी संजय शिरसाट यांचा काही एक संबंध नसल्याचेही महिलेने स्पष्ट केले आहे. त्यांनी आजवर मला कधीही त्रास दिलेला नाही किंवा काही बोललेले नाहीत. माझ्यावर त्यांचा काहीच दबाव नाही. जो काही विषय होता, तो त्यांचा मुलगा आणि माझ्यातच होता. पण तोही मी संपवला आहे.

दरम्यान महिलेने असेही सांगितले की, माझ्या वकिलाला नोटीस मागे घेण्याची विनंती केली आहेच. त्याशिवाय या प्रकरणात यापुढे कोणतेही कायदेशीर पाऊल न उचलण्यास सांगितले आहे. तसेच आम्ही आपसात बोलून या विषयातून मार्ग काढू.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women withdraws all allegations on siddhant shirsat son of minister sanjay shirsat kvg