Yavatmal Husband Murder Case: यवतमाळ येथे एक गंभीर गुन्ह्याची घटना घडली असून पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपी मुख्याध्यापिकेला अटक केली आहे. यवतमाळ शहरापासून काही अंतरावर असलेल्या लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौसाळा जंगलात १५ मे रोजी जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र काही दिवसातच स्थानिक गुन्हे शाखेने मृताची ओळख पटवत गुन्हेगार पत्नीला अटक केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांनी सदर गुन्ह्याची माहिती देताना सांगितले की, १५ मे रोजी मृतदेह आढळून आल्यानंतर आम्ही तपासाची सूत्रे फिरवली. दरम्यान मृत व्यक्ती त्याच्या मित्रांसमवेत रोज दारू पिण्यासाठी बारमध्ये बसत असे. दि. १३ मे पासून तो दिसून आलेला नसल्याची माहिती बारमधील मित्रांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी बारमधील मद्यपींची चौकशी केल्यानंतर मृताची ओळख पटवली.

मृताच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३ मे रोजी त्याने जे शर्ट घातले होते, त्या शर्टचे जळालेले तुकडे मृतदेहाच्या शेजारी घटनास्थळी आढळून आले होते. या पुराव्यावरून पोलिसांनी मृताचे घर गाठले आणि त्याच्या पत्नीची चौकशी केली. यावेळी पत्नीने विसंगत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता पत्नीने खून केल्याचे मान्य केले.

पती-पत्नी एकाच शाळेत

दरम्यान मारेकरी पत्नी ज्या शाळेत मुख्याध्यापिका होती. त्याच शाळेत पती शिक्षक होता. वर्षभरापूर्वीच दोघांचा प्रेमविवाह झाला होता. तेव्हापासून मृत पती आपल्या आई-वडिलांपासून विभक्त राहत होता. मात्र दारूच्या व्यसनामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी कलह होत होता. रोजच्या भांडणाला कंटाळून मुख्याध्यापक पत्नीने शिक्षक पतीचा खून केला, अशी माहिती संतोष मनवर यांनी दिली.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर

सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर पुढे म्हणाले की, आरोपी पत्नीने पतीला मिल्कशेकमधून विष दिले. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्याच तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांची मदत घेतली. पोलिसांनी तीनही मुलांना ताब्यात घेतले आहे.