अग्निवीर अक्षय गवातेला सीमेवर लढताना वीरमरण आलं. त्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत खंत व्यक्त केली आणि अक्षय गवतेबाबत पोस्ट लिहित त्या जवानाला श्रद्धांजलीही वाहिली. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट समोर आली आहे. त्यांनी या प्रकरणावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. सीमारेषेवर चार अग्निवीरांचा मृत्यू झाला. मात्र त्यांना सन्मान मिळाला नाही. युवकांना देशाच्या सीमारेषेवर उभं करुन मृत्यूचा खेळ खेळवण्यासाठीच हे केलं जातं आहे का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट?

“आत्तापर्यंत सीमेवर चार अग्निवीरांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबाला व्यवस्थित सन्मान मिळालेला नाही. ज्या अग्निवीरांचा सीमेवर लढताना मृत्यू झाला त्यांच्या आई वडिलांना काय मिळणार आहे? हे अजून माहित नाही. देशाच्या तरुणांना सीमेवर उभं करुन मृत्यूचा खेळ खेळवण्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे का? या अग्निवीरांना शहीद हा दर्जा मिळाला पाहिजे. सरकार तो दर्जाही त्यांना देत नाही. हे कोणत्या सैनिकी परंपरेचं पालन करणं आहे? देशाच्या तरुणांची केलेली ही क्रूर थट्टा आहे.” या आशयाची पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

https://x.com/Awhadspeaks/status/1716521048370479268?t=A8AmezKE1ub3WqtG8639cQ&s=08

सुप्रिया सुळेंची पोस्ट काय?

बुलढाणा येथील रहिवासी असलेले जवान अक्षय गवते हे सियाचीन येथे कर्तव्यावर रुजू असताना शहिद झाले. हि घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. अक्षय यांना भावपूर्ण श्रद्धांजली. गवते कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली. असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंं आहे.

अक्षय लक्ष्मण गवते यांच्या पार्थिवावर सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. जेमतेम २२ वर्षे वय असलेल्या जवानाने देशासाठी आपला जीव गमावला. रविवारी संध्याकाळी त्यांचं पार्थिव घेऊन येणारं विमान छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झालं. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हे पार्थिव लष्करी वाहनाने पिंपळगाव सराई येथे नेण्यात आलं. लक्ष्म्ण गवाते हे अग्निवीर योजनेतून भारतीय लष्करात सहभागी झाले होते. याच मृत्यूनंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youths are born to play the game of death ask jitendra awhad after akshay gawate death scj