अभिनेता आमिर खानच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये सर्वजण व्यग्र असून अभिनेता आमिर खानही त्याच्या परिने या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कशाचीही कमतरता पडू देत नाहीये. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रत्येक फोटोपासून ते अगदी चित्रपटाच्या गाण्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्रच ‘दंगल’ या चित्रपटाची प्रशंसा आणि चर्चा सुरु असतानाच या चित्रपटाचे शिर्षकगीताचा ऑडिओ व्हर्जन काल प्रदर्शित करण्यात आला होता. अभिनेता आमिर खाननेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती सर्वांसोबत शेअर केली होती. त्यानंतर आता या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘मुलीला मुलाशी कुस्ती करायला लावणार.. तुला तुझी इज्जर प्यारी नसेल पण आम्हाला आमची इज्जत प्यारी आहे..’ असे म्हणणा-या आखाड्याच्या आयोजकांशी आपल्या मुलींसाठी दोन हात करणा-या एका बापाची झलक यात पाहावयास मिळते. ‘हारना नही है गीता’ असे ओरडत आपल्या मुलीचे मनोबल वाढवणारा बापही यात दिसतो. विशेष म्हणजे व्हिडिओशेवटी तरुणपणातील महावीर सिंग फोगट म्हणजेच आमिर धोबीपछाड खेळी खेळत समोरच्याला चितपट करताना दिसतो. ‘तेरी कहानी पग पग प्यारे दंगल दंगल…..’ असे बोल असणाऱ्या या गाण्याला खणखणीत आवाजाचे गायक दलेर मेहंदी यांनी गायले आहे. त्यामुळे गाण्याचे शब्द, त्याची चाल आणि एकंदर दलेर मेहंदी यांचा अवाज, पार्श्वभागात मिळणारा ढोलांचा ठेका या गाण्याच्या जमेच्या बाजू आहेत. अमिताभ भट्टाचार्य यांच्या लेखणीतून उतरलेल्या या प्रोत्साहनपर गाण्याला प्रितमने संगीतबद्ध केले आहे.
"Bhed ki hahakar ke badle, sher ki ek dahaad hai pyaare Dangal Dangal". #Dangal title track video out now: https://t.co/iSKyv9t5m5
— UTV Motion Pictures (@utvfilms) December 9, 2016
या चित्रपटामध्ये अभिनता आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेमध्ये झळकणार आहे. आपल्या मुलींना कुस्तीसारख्या पुरुषी खेळामध्ये तरबेज बनवण्यासाठी आणि याच खेळामध्ये भविष्य घडवण्यासाठी मुलींना प्रोत्साहन देणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी वडिलांच्या भूमिकेत आमिर दिसणार आहे. सध्या विविध मार्गांनी या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये ‘दंगल’चे सर्वच कलाकार व्यग्र आहेत. पण, प्रसिद्धीचा मुख्य स्त्रोत मानल्या जाणाऱ्या टेलिव्हीजन कार्यक्रमांच्या माध्यमातून मात्र या चित्रपटाचे प्रमोशन केले जात नाहीये. ‘दंगल’च्या प्रसिद्धीसाठी या चित्रपटाच्या मेकिंगचे काही व्हिडिओ, आमिरच्या व्यायामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आणि अशा हटके मार्गांचा अवलंब करत ‘दंगल’ या चित्रपटाचे प्रमोशन केले जात आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रसिकांना आमिर खान विविध रुपांमध्ये दिसणार आहे. आमिरसोबतच अभिनेत्री साक्षी तन्वर या चित्रपटामध्ये महावीर सिंग फोगट यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ‘म्हारी छोरिया छोरोसे कम है के?’, असे म्हणणारा आमिर खान या चित्रपटाद्वारे २३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आमिरने साकारलेली महत्त्वाकांक्षी वडिलांची भूमिका प्रेक्षकांना प्रोत्साहित करणार का? याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.