‘आप जैसा कोई’ या गाण्यातील बोल जसे आहेत अगदी त्याच धर्तीवरची संगीतमय प्रेमकथा याच नावाने नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटात आहे. आपल्या मनातला जोडीदार शोधता शोधता उलटलेलं वय, नवथर प्रेमात वाहून जाणारं वय नसलं तरी प्रेमात भान विसरणारं मन आणि आपल्याला हवी तशीच व्यक्ती समोर आहे हे लक्षात आल्यानंतर जोडीदार म्हणून त्याची साथ कायम लाभावी, यासाठी होणारी धडपड हा सगळा प्रवास ‘आप जैसा कोई’ चित्रपटात अनुभवता येतो.
जमशेदपूर आणि कोलकाता दोन शहरांत चित्रपटाची कथा घडते. श्रीरेणू त्रिपाठी (आर. माधवन) हा संस्कृतचा प्राध्यापक. मोठ्या भावाचा धाक आणि वहिनीची माया दोन्हींच्या छायेत वाढलेल्या श्रीचं चाळिशी उलटून गेली तरी लग्न होत नाहीये. अतिशय साधेपणाने राहणारा, व्यवहारी जगाच्या कल्पनांपासून दूर असलेला, अतिशय निरागस, निगर्वी असा श्री आपल्या सगळ्या भावना फक्त आपल्या मित्राकडे मनमोकळेपणे व्यक्त करतो. एकटेपणाने त्रासलेल्या श्रीला त्याचा मित्र एका डेटिंग अॅपविषयी सुचवतो. या अॅपद्वारे किमान कोणीतरी प्रेमाने आपल्याशी बोलतं आहे या जाणिवेने सुखावलेल्या श्रीच्या आयुष्यात अचानक मधु बोस नामक वादळ येतं. अत्यंत हुशार, चुणचुणीत, दिसायला सुंदर, आधुनिक राहणीमान, विचार सगळ्याच बाबतीत पुढारलेली, फ्रेंच शिकवणारी मधु आणि जमशेदपूरच्या पारंपरिक पुरुषप्रधान कुटुंबात लहानाचा मोठा झालेला श्री एकमेकांच्या प्रेमात पडतात. भेटीगाठी होतात, लग्नाची तारीखही ठरते आणि साखरपुड्याची अंगठी घालून ही प्रेमकथा सुफळ संपूर्णतेच्या दृष्टीने प्रवास करणार तितक्यातच माशी शिंकते. आता या प्रेमकथेतला हा अडथळा नेमका कशाचा? त्याचे सामाजिक संदर्भ, त्याचा मुख्य नायक – नायिकेच्या मनावर झालेले परिणाम असे अनेक वेगवेगळे धागे एकत्र गुंफत ‘आप जैसा कोई’ची कथा रंगवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
‘आप जैसा कोई’ ही म्हटलं तर आजच्या पिढीची कथा आहे. पण ती कथा मांडताना अजूनही एका पिढीची जडणघडण ही बुरसटलेल्या विचारसरणीतूनच झाली आहे, याची जाणीवही लेखक – दिग्दर्शकाने करून दिली आहे. हे संदर्भ चित्रपटाच्या कथेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असले तरी त्याची मांडणी मात्र ठोकताळ्यांच्याच आधारे करण्यात आली आहे. नायक हा झारखंडच्या जमशेदपूरचा आहे, जिथे एकत्रित कुटुंबपध्दती आणि पुरुषसत्ताक कुटुंबव्यवस्था आहे. तर नायिका पुढारलेल्या विचारांच्या बंगाली कुटुंबातली. एका व्यवस्थेत स्त्रीला स्वत:चा आवाजच नाही, तर दुसऱ्या व्यवस्थेत स्त्रिया खूप खंबीरपणे, मोकळेपणाने घरातल्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरत आहेत. वरवर पाहता श्रीला मधुच्या घरातील स्त्रियांचा मोकळेढाकळेपणा खटकत नाही. त्याला त्याच्या वहिनीची अवस्था लक्षात येते, पण म्हणून आपला भाऊ चुकतो आहे हे सांगण्याचं धैर्य त्याच्याकडे नाही. आणि त्या अर्थाने एका वैचारिक चौकटीत तो कसा अडकून पडला आहे याची जाणीव कथेच्या ओघात दिग्दर्शक सहजपणे करून देतो.
हा धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेला चित्रपट आहे. अशाच पध्दतीचे कथानक करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटातही पाहायला मिळते. तशाच पध्दतीने पुढारलेल्या बंगाली कुटुंबातील नायिका आणि रुढीवादी कुटुंबातील नायक… दोन्हीकडे एकमेकांच्या संगतीने होणारे बदल हाही एक धागा आहे. तिथेही नायकाची आई एका क्षणी रुढी परंपरांविरोधात व्यक्त होत आपलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करते. तर इथे नायकाची वहिनी वयाच्या एका टप्प्यावर आपल्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा हात हातात धरते. या रुढ चौकटीत मुख्य नायक आणि नायिकांचा गोंधळ, त्यांची मनोवस्था या गोष्टी बाजूलाच पडतात. त्यातल्या त्यात आर. माधवन आणि फातिमा सना शेख यांच्या व्यक्तिरेखांची मांडणी, त्या अनुषंगाने त्यांनी केलेला सहज अभिनय यामुळे चित्रपटाचा तोल सावरला आहे.
आप जैसा कोई
दिग्दर्शक – विवेक सोनी
कलाकार – आर. माधवन, फातिमा सना शेख, नमित दास, मनीष चौधरी, आयेशा रझा, साहेब चॅटर्जी.