बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तो सोशल मीडियावरुन नेहमीच चाहत्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात अनेक वेळा नेटकरी अभिषेकला ट्रोल करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अनेकवेळा अभिषेक त्या नेटकऱ्यांना मजेशीर आणि सडेतोड उत्तर देताना दिसतो. आता एका नेटकऱ्याने अभिषेकच्या खाजगी आयुष्यावर कमेंट केल्यानंतर अभिषेकने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिषेकचा ‘द बिग बुल’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावरच एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “तू काही कामाचा नाहीस. फक्त मी तुझ्याकडे असलेल्या एका गोष्टीमुळे जळतो. ती गोष्ट आहे, तुझी पत्नी. तुला इतकी सुंदर पत्नी कशी मिळाली.” खाजगी आयुष्यावर कमेंट केल्यानंतर अभिषेक थांबला नाही त्याने त्या नेटकऱ्याला लगेच उत्तर दिले.

अभिषेक म्हणाला,”तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. पण मला कळतं नाही, तुम्ही नक्की कोणाबद्दल बोलताय. कारण इलियाना, निक्की यांच तर लग्न झालेलं नाही. मग राहिलो मी, अजय, कुकी आणि सोहम. मला वाटतं डिस्नी हॉटस्टारचं देखील लग्नाचे स्टेटस पाहावे लागेल.” अशा आशयाचे ट्विट अभिषेकने केले आहे.

अभिषेक पहिल्यांदाच ट्रोल झालेला नाही तर या आधी देखील अभिषेक बऱ्याचवेळा ट्रोल झाला आहे. ‘द बिग बुल’ हा चित्रपट स्टॉकब्रोकर हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित आहे. ज्याची भूमिका अभिषेक बच्चन साकारत आहे. या आधी याच विषयावर ‘स्कॅम १९९२’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. ज्यात अभिनेता प्रतिक गांधी मुख्य भूमिकेत दिसला होता. ‘स्कॅम १९९२’ ही वेब सीरिज लोकप्रिय सीरिज पैकी एक आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या दोघांमध्ये बरीच तुलना होताना दिसत आहे.