Actor Vijay Receivs Bomb Threat : दाक्षिणात्य अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचा प्रमुख विजयच्या चेन्नईतील निवासस्थानी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी मिळाली आहे. ही घटना करूरमधील प्रचारसभेत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर काही दिवसांतच घडली आहे.

ही माहिती मिळताच पोलिस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विजयच्या घराची चौकशी करण्यात आली. मात्र, घरी कोणतेही स्फोटक साहित्य आढळून आले नाही. यानंतर विजयच्या नीलांकराई येथील घरी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

ई-मेलद्वारे दिली धमकी

गुरुवारी विजयला एक ई-मेल आला होता आणि या मेलमध्ये नमूद केलं होतं की, त्याच्या नीलांकराई येथील घरी बॉम्ब ठेवण्यात आला आहे. यानंतर पोलिस सतर्क झाले आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. तपासानंतर हे संपूर्ण प्रकरण अफवाच असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं.

पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाने संपूर्ण परिसराची तपासणी केल्यानंतर कोणताही स्फोटक पदार्थ आढळून आला नाही, त्यामुळे ही धमकी बनावट (फेक) असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरीही या प्रकणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

पोलीस काय म्हणाले?

जागरणच्या वृत्तानुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलने माहिती दिली की, रात्री सुमारे ३ वाजता त्यांनी तपास सुरू केला. या तपासादरम्यान काहीच संशयास्पद मिळालं नाही, त्यामुळे सकाळी साडेसातच्या सुमारास पोलिस तिथून निघून गेले.

या घटनेनंतर एका सहाय्यक पोलिस आयुक्तांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, शहरातील प्रसिद्ध व्यक्तींना ‘हॉटमेल’ अकाउंटवरून बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या ई-मेलद्वारे मिळत आहेत. याआधी गेल्या महिन्यात अभिनेते आणि नेते एस. व्ही. शेखर यांनाही अशीच धमकी देणारा मेल आला होता. या सर्व मेलमध्ये दिलेली माहिती आणि शब्दरचना जवळपास सारखीच असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, सध्या पोलिस या सर्व धमक्या देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. सतत मिळणाऱ्या या अफवांमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसंच प्रसिद्ध व्यक्तींच्या परिसरातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.