Actor Robo Shankar Passed Away: लोकप्रिय तमिळ अभिनेता आणि कॉमेडियन रोबो शंकर यांचे गुरुवारी वयाच्या ४६ व्या वर्षी चेन्नई येथे निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांना चेन्नईतील जीईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान मल्टीऑर्गन फेल्युअर आणि मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

रोबो शंकर बुधवारी एका चित्रपटाचे शूटिंग करताना सेटवर बेशुद्ध पडला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि गुरुवारी रात्री ८.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रोबो शंकर यांच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चाहते व सेलिब्रिटी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. कमल हासन, विजय सेतुपती, वरलक्ष्मी आणि राधिका सारथकुमार तसेच दिग्दर्शक वेंकट प्रभू यांनीही पोस्ट करून रोबो शंकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शंकर यांना त्यांच्या सिग्नेचर रोबोट-स्टाइल डान्समुळे ‘रोबो’ म्हटलं जायचं. ते रोबो शंकर या नावाने ओळखले जायचे. त्यांनी टीव्हीवर काम करून आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि नंतर ते चित्रपटांमध्ये आले.

रोबो शंकर यांनी इधरकुटाने असईपट्टई बालकुमारा, वायई मूडी पेसावुम, वेलेनु वंधुत्ता वेल्लईकरन, कडवूल इरुकान कुमारू, सिंगम ३, विश्वासम, कोब्रा, मारी, आर यू ओके बेबी?, सिंगापूर ओ सलून, सिंगापूर ओ सलून यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ते शेवटचा सोट्टा सोट्टा नानायुथू या चित्रपटात झळकले होते. हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला होता.

रोबो शंकर यांच्या पश्चात पत्नी प्रियंका शंकर आणि मुलगी इंद्रजा शंकर आहेत.