सध्या हिंदी चित्रपटसृष्टीसह अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही कौतुकाचा विषय ठरलेल्या ‘छावा’ चित्रपटात मराठीतील उत्तम कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. या चित्रपटात संभाजी महाराजांचा विश्वासू साथीदार रायाजी माळगे याची भूमिका अभिनेता संतोष जुवेकर याने केली आहे. या चित्रपटात आम्ही निव्वळ अभिनय केलेला नाही, तर तो इतिहास अक्षरश: जगलो आहोत, अशी भावना संतोषने व्यक्त केली. ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या विशेषांकाच्या प्रकाशनानिमित्ताने प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित असलेल्या संतोष जुवेकरने ‘छावा’ चित्रपटातील भूमिकेसाठी केलेली तयारी, प्रत्यक्ष चित्रीकरणादरम्यान आलेले अनुभव कथन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटासाठी साडेतीन ते चार महिने कलाकारांनी तलवारबाजी, घोडेस्वारी, भाला या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण घेतले, अशी माहिती देतानाच यानिमित्ताने आपण पहिल्यांदाच घोडेस्वारी शिकलो आणि पडद्यावर डौलात घोडेस्वारी केली, असं संतोषने सांगितलं. ‘शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेताना, आपले मावळे त्या काळात एवढ्या वजनाची शस्त्रं घेऊन कसे लढले असतील, याची जाणीव झाली. खरोखरच या महापुरुषांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे, याची जाणीव आपल्या सर्वांना असलीच पाहिजे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की कलाकार म्हणून मला या चित्रपटात काम करायला मिळालं आणि तो इतिहासही अनुभवायला मिळाला’ अशी भावना त्याने व्यक्त केली.

महापुरुषांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायलाच हवा. ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी लहान मुलांना घेऊन गेलंच पाहिजे. आपले महाराज कशासाठी लढले हे त्यांनी पाहिले पाहिजे. या महापुरुषांचा इतिहास त्यांना समजला पाहिजे, असं सांगतानाच संभाजी महाराजांवर हा चित्रपट असल्याने त्याला अपेक्षेपेक्षा अधिक प्रेम मिळतं आहे, अशी भावनाही त्याने व्यक्त केली.

इतिहासाला गालबोट लागू नये म्हणून…

महाराजांच्या इतिहासाला कुठेही गालबोट लागू नये, लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, ही भावना चित्रपट करताना प्रत्येकाच्या मनात होती. त्यामुळे प्रत्येकाने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली असल्याचं संतोषने सांगितलं. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, निर्माते दिनेश विजन वा संगीतकार ए. आर. रहमान असोत या चित्रपटाचा भाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा सिनेमा म्हणजे एकप्रकारची जबाबदारी होती. त्यामुळे ‘छावा’ कादंबरी वाचून त्यानंतर जवळपास साडेपाच वर्षांच्या मेहनतीनंतर चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आणि मग त्याचं चित्रीकरण पार पडलं, असंही त्याने स्पष्ट केलं.

गणोजी शिर्केंच्या भूमिकेसाठी ऑडिशन झाली होती…

या चित्रपटात खरंतर गणोजी शिर्के यांच्या भूमिकेसाठी आपली ऑडिशन घेण्यात आली होती, पण प्रत्यक्षात ती भूमिका करण्याची आपली अजिबात इच्छा नव्हती, असं संतोषने सांगितलं. ऑडिशन देण्याआधीच मी ‘छावा’ कादंबरी वाचली होती. या चित्रपटात कोणतीही भूमिका मिळाली तरी ती करायची माझी तयारी होती, पण ज्या व्यक्तीमुळे महाराजांना बलिदान द्यावं लागलं ती भूमिका मनापासून करायची नव्हती. त्यामुळे खरंतर चित्रपटात भूमिका मिळेल हा विचारच सोडून दिला होता, असं त्याने सांगितलं. एखादी गोष्ट आपण मनापासून मागतो तेव्हा ती आपल्याला मिळतेच, याची प्रचीती मी घेतली जेव्हा मला उतेकरांच्या कार्यालयातून भेटायला बोलावण्यात आलं. आणि त्यांनी गणोजीच्या ऐवजी रायाजीच्या भूमिकेसाठी तुझी निवड झाली असं सांगितलं, तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता, अशी आठवण संतोषने सांगितली.

शब्दांकन : पूर्वा भालेकर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor santosh juvekars feelings about the movie chhawa amy