ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने यांचं निधन झालं. मुंबईतील माहिम इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपट लेखक ग. रा. कामत यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या. रेखा कामत आणि चित्रा नवाथे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. या दोघी बहिणींनी मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजविला. मालिकांमध्ये ही त्यांनी काम केले. प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रपंच’ ही त्यांची पहिली मालिका. या मालिकेत त्यांनी साकारलेली ‘आक्का’ ही भूमिका त्याकाळी गाजली होती. ‘सांजसावल्या’ मालिकेतही त्यांनी काम केले. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधील ‘माई आजी’ तर प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. ‘आजी’ असावी तर अशी, अशी ओळख या मालिकेमुळे त्यांना मिळाली. नव्या पिढीलाही रेखा कामत हे नाव माहिती झाले. अनेक जाहिरातींमधूनही त्यांनी ‘आजी’ची भूमिका साकारली आहे. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती अभिनयाच्या या चारही क्षेत्रांत त्यांनी भरपूर काम केले असले तरी नाटक हे त्यांच्या अधिक आवडीचे होते.

१९५२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाखाची गोष्ट’ हा रेखा यांचा पहिला चित्रपट. यामध्ये चित्रा यांनीसुद्धा काम केलं होतं. राजा परांजपे, ग. दि माडगूळकर आणि सुधीर फटके या त्रिमूर्तींचा हा चित्रपट होता. कुमुद आणि कुसुम ही जुन्या वळणाची नावं नकोत, चित्रपटासाठी जरा आकर्षक नावं पाहिजेत म्हणून ‘गदिमां’नी रेखा आणि चित्रा असं नामकरण केल्याचं, त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. याच नावांनी त्यांनी मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आणि पुढे हीच नावं त्यांची ओळख बनली.

रेखा यांनी ‘कुबेराचे धन’, ‘गृहदेवता’ (यात त्यांची दुहेरी भूमिका होती), ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘माझी जमीन’ तर अगदी अलीकडचा ‘अगंबाई अरेच्चा’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. ‘नेताजी पालकर’ चित्रपटात त्यांनी एक लावणी नृत्य तर ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटात बैठकीची लावणीही सादर केली. व्यावसायिक मराठी रंगभूमीवरही रेखा यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘संशयकल्लोळ’ आदी संगीत नाटकांतून तसेच ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कालचक्र’ आदी व्यावसायिक नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या.

रंगभूमीवर काम करत असतानाच त्यांनी विजया मेहता दिग्दर्शित ‘यातनाघर’ तसेच अमोल पालेकर दिग्दर्शित ‘पार्टी’ या प्रायोगिक नाटकातही काम केले. त्यांनी केलेल्या सर्व नाटकांची एकूण प्रयोगसंख्या पाच हजारांहून अधिक आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress rekha kamat passes away at the age of 89 dcp