‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाची सलग चौथ्या आठवडयातही घोडदौड कायम आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. अन्य चित्रपटांकडून स्पर्धा असूनही, ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. अलीकडच्या काळात कुठलाही चित्रपट सिनेमागृहात एक आठवडयापेक्षा जास्त दिसत नाही. पण ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट अपवाद ठरला आहे.

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांवरच या चित्रपटाने मोहिनी घातली आहे. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनातून साकारलेल्या या चित्रपटातून तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पडद्यावर मांडण्यात आली आहे. अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांच्या दमदार भूमिकांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवतो.

गाठले कमाईचे शिखर
चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाने २५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पुढच्या आठवडयापर्यंत हा चित्रपट २७५ कोटीपर्यंत मजल मारु शकतो. प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसात या चित्रपटाने ५० कोटी, त्यानंतर आठवडयाभराच्या आत या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा गाठला. तान्हाजी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी भारतीय चित्रपट इतिहासात दुसऱ्या आठवड्यात ६० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करणे केवळ सातच चित्रपटांना शक्य झाले आहे. या यादीत आता ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट देखील सामिल झाला आहे.