अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या अफेअरबद्दल कोणाला माहित नाही? रणबीरला काही दिवसांपूर्वीच करोना संसर्ग झाला आहे आणि त्यामुळे तो गृहविलगीकरणात आहे. त्यामुळे आलिया त्याला खूपच मिस करत आहे असं दिसत आहे.
नुकतंच आलियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत या दोघांनी एकमेकांच्या हातात हात गुंफले आहेत. हा त्यांचा जुना फोटो आहे. या फोटोला तिने कॅप्शनही दिलं आहे. “मेजर मिसिंग” आणि एक लाल बदाम यासह तिने हा फोटो पोस्ट केला आहे.
रणबीर सध्या करोनाबाधित असल्यानं गृहविलगीकरणात आहे. तर आलियाचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तिने काल आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून आपण निगेटिव्ह असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच तिने तिच्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत. ती म्हणते, “मी तुमचे काळजीचे आणि विचारपूस करणारे मेसेज वाचत आहे. माझा करोना अहवाल निगेटिव्ह आला असून काही दिवस विलगीकरणात राहिल्यावर आणि माझ्या डॉक्टरांना विचारून मी आता उद्यापासून कामाला सुरुवात करत आहे. तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मी माझी काळजी घेत आहे आणि सुरक्षित आहे. तुम्हीही तुमची काळजी घ्या.” या सोबतच तिने चाहत्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहनही केलं आहे.
रणबीर आणि आलिया तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. लवकरच ते दोघे ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात एकत्र पाहायला मिळतील. याशिवाय रणबीर ‘शमशेरा’ आणि ‘ऍनिमल’ या चित्रपटांमध्ये दिसेल तर आलिया ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि राजामौलीच्या ‘आर आर आर’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.