अभिनेता अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणे आढळली असून नानावटी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. बिग बींनी शनिवारी रात्री उशीरा ट्विट करत करोना झाल्याची माहिती दिली. त्यानंतर कलाविश्वातील अनेकांना ते लवकरच बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. यात गानकोकिळा लता मंगेशकर यांनीही ट्विट करत त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. सोबतच ते लवकर बरे होतील, असा विश्वासही दाखविला आहे.

“नमस्कार अमितजी. तुमच्यावर आणि अभिषेकवर देवाचा आशीर्वाद आहे. तुम्ही लवकरच बरे होऊन घरी यायल याची मला खात्री आहे”, असं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली. बिग बींना करोनाची लागण झाल्याचं समजताच त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचीही करोना चाचणी करण्यात आली. यात ऐश्वर्या राय-बच्चन, जया बच्चन आणि आराध्या बच्चन यांचे रिपोर्टस निगेटिव्ह आले. तर अभिषेक बच्चन याचे रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह आले. त्यामुळे सध्या बिग बी आणि अभिषेक या दोघांवर नानावटीमध्ये उपचार सुरु आहेत.

काय म्हटलं आहे अमिताभ बच्चन यांनी?

माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही चाचण्या आणखीही केल्या जाणार आहेत. मागील दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असं आवाहन मी करतो आहे. या आशयाचं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.