शाळेच्या आठवणींमध्ये रमायला सर्वानाच आवडते. मग यात कलावंत तरी कसा अपवाद ठरतील? मुंबईत ‘पी. अ‍ॅण्ड जी. शिक्षा’ या कार्यक्रमासाठी आलेल्या अर्जुन कपूरने त्याच्या शाळेतील आठवणींना उजाळा देत उपस्थितांना आपल्या शालेय जीवनातून फिरवून आणले. अर्थात आपल्यासमोर आपला आवडता नट उभा आहे हे पाहून मुलांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पण त्याच वेळी त्यांच्या मनात असंख्य प्रश्नांचे काहूर माजले होते. हातात माईक मिळताच त्यांनी अर्जुनवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. ‘तू शाळेत कसा होतास? तुझा आवडता विषय कोणता होता? तुला शाळेतील नक्की कोणती जागा खूप आवडायची? तुझे आवडते शिक्षक कोण? असे अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली. दरवेळी पत्रकारांचे प्रश्न शिताफीने टाळणाऱ्या अर्जुनला मुलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणेमात्र शक्य झाले नाही.
आपण एक आळशी विद्यार्थी होतो असे अर्जुनने जाहीर करून टाकले. त्याचा आवडता विषय इतिहास सोडला तर बाकी सर्व विषयांमध्ये तो काठावर पास होत असे. शाळेत मागच्या बाकावर बसून स्नप्नरंजन करणे हे त्याचे आवडते काम असायचे. मुळात वर्गात शिकण्यातच रस नसल्याने विशिष्ट शिक्षक आवडण्याचा प्रश्नच नव्हता. त्यातल्या त्यात त्याला वेगवेगळे मैदानी खेळ खेळायला खूप आवडायचे. ‘‘अर्थात वजन खूप असल्याने फार कमी खेळांमध्ये जिंकायचो, तरीही खेळांमध्ये भाग घेणे कधीच सोडले नाही,’’ असे त्याने सांगितले.
शाळेतील बास्केट बॉलचे मैदान हे आवडते ठिकाण होते. त्याचबरोबर घरातून लपून शाळेत बॉल नेणे, मधले तास किंवा मधल्या सुट्टीत मैदानावर खेळायला जाणे असे उद्योगही त्याने न चुकता केले होते. थोडक्यात या चिमुरडय़ांनी काही काळ का होईना अर्जुनला त्याच्या लहाणपणाच्या आठवणींमध्ये गुंतवण्यात यश मिळवले.