Ashok Saraf एकनाथ शिंदे म्हणजे विलक्षण कलाप्रेमी माणूस असं म्हणत अभिनेते अशोक सराफ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं. मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई शाखा आणि बाल रंगभूमी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘कलासेवक’ सन्मान सोहळ्यात अशोक सराफ यांनी हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार विजेते अभिनेते, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ आणि प्रख्यात सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांचा विशेष सन्मान करून त्यांना गौरविण्यात आलं. यावेळी मनोगत व्यक्त करताना अशोक सराफ यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.

काय म्हणाले अशोक सराफ?

“पुरस्कार खूप मिळाले आहेत, मिळत आहेत. आजचा पुरस्कार हा सुरुवातीपासूनच विलक्षण होता की मी वर्णनही करु शकत नाही.एवढ्या पावसात तुम्ही सगळेजण बाहेर उभे होतात. स्पेशल गाडीतून आम्ही आलो असा सन्मान मला पहिल्यांदाच मिळाला. माझ्या येण्यापासून जी काही सुरुवात सत्काराला झाली ती लक्षात ठेवण्यासारखी आहे.” असं अशोक सराफ म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणजे विलक्षण कलाप्रेमी माणूस-अशोक सराफ

“एकनाथ शिंदेंच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. एकनाथ शिंदे म्हणजे विलक्षण कलाप्रेमी माणूस. कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कायम पुढे असतात. यापुढेही ते कलाकारांचे प्रश्न सोडवतील अशी खात्री मला आहे. एकनाथ शिंदेसारखा एक कलाप्रेमी माणूस, कलाकारांवर प्रेम असलेला माणूस आपल्याला उपमुख्यमंत्री म्हणून लाभला आहे. मी त्यांच्याकडून घेतलेला हा दुसरा मोठा पुरस्कार आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कारही त्यांच्याच हस्ते मिळाला होता. तो क्षण आणि आजचा क्षण दोन्ही माझ्यासाठी विलक्षण मानतो” असं अशोक सराफ म्हणाले.

लोकांना आवडेल तेच करायचं किंवा तो विचार करायचा हे माझ्यासाठी महत्त्वाचं-अशोक सराफ

माझं म्हणाल तर काय पुरस्कार मिळत गेले, लोक कौतुक करत गेले. मी विलक्षण दबला गेलो या कौतुकाखाली. मी माझं कौतुक करण्यापेक्षा मी प्रेक्षकांचं कौतुक करतो. कारण मी जे करत गेलो ते त्यांना आवडत गेलं. करणाऱ्यापेक्षा आवडणं महत्त्वाचं असतं. मग मला वेगळी सवय लागली की लोकांना आवडेल ते करायचं किंवा लोकांना आवडेल कसं याचा विचार करायचा. शिवाय आपण जे सादर करतो त्यावर विलक्षण प्रेम करावं. नवं शोधण्याची तयारी ठेवावी. असंही अशोक सराफ म्हणाले.

अशोक सराफ यांनी केलं प्रशांत दामलेंचं कौतुक

प्रशांत दामलेंचंही कौतुक अशोक सराफ यांनी केलं. प्रशांत दामलेकडे विलक्षण निरीक्षण शक्ती आहे. हा माणूस कधीही नुसता बसत नाही तो निरीक्षण करत असतो, कोण काय करतो, कसं बोलतो? ही त्याची कृती सतत सापडते, ही क्वालिटी फार कमी लोकांमधे असते. निरीक्षण हे कलाकारांसाठी फार महत्त्वाचं असतं. निरीक्षणातून शिकता येतं. निरीक्षण येत नसेल तर शिकता येत नाही. प्रशांत दामले यांना कित्येक तास माझ्याकडे पाहिलं आहे. तो सतत निरीक्षण करत असतो. प्रशांत एक उत्कृष्ट कलाकार आहे. कलाक्षेत्रात जे काम करत आहेत त्यांना सांगतो की असं करता येणं ही सोपी गोष्ट नाही. असंही अशोक सराफ म्हणाले.