Avika Gor Mangalsutra Goes Missing Viral Video : अविका गौरच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अभिनेत्रीने ३० सप्टेंबरला तिचा प्रियकर मिलिंद चंदवानीशी लग्न केले आहे. अविका गोर आणि रोडीज स्टार मिलिंद चंदवानी यांच्या लग्नाचे कार्यक्रम कलर्सच्या ‘पती पत्नी और पंगा’ या शोमध्ये करण्यात आले आहे.

शोच्या सेटवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये अविका गोर रडताना दिसत आहे. मिलिंद चांदवानी तिला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. प्रत्यक्षात अविकाचे मंगळसूत्र हरवले आहे आणि त्यामुळे ती रडते आहे. अविकाच्या या व्हिडीओवर नेटकरी संतापले आहेत.

अविका गोर आणि मिलिंदच्या लग्नाचा भाग अद्याप प्रसारित झालेला नाही. या भागातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अविका तिच्या लग्नाच्या पोशाखात बसलेली दिसते आणि मिलिंद तिच्या शेजारी बसलेला आहे. व्हिडीओत असे दिसत आहे की गिफ्ट बॉक्समध्ये मंगळसूत्र नाहीये. मंगळसूत्र हरवल्यानंतर अविका रडू लागते.

अविका रडली तेव्हा मुनावर फारुकी काय म्हणाला?

व्हिडीओमध्ये कोणीतरी म्हणत आहे की, “मस्करी करू नकोस.” अविका रडत आहे आणि मिलिंद तिला समजावत आहे. कोणीतरी असे म्हणत आहे की, “कृष्णा, जर तू मंगळसूत्र घेतले असेल तर ते परत दे.” दरम्यान, दुसरा कोणीतरी अविकाला रडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो. व्हिडीओमध्ये मुनावर फारुकी म्हणतो की, जर कोणी सेटवर मस्करी करत असेल तर अविकाला रडताना पाहून त्याने मंगळसूत्र परत केले असते. मुनावर मिलिंद आणि अविकाला आपापसातच हे प्रकरण सोडवण्यास सांगतो.

नेटकरी का संतापले आहेत?

या व्हायरल व्हिडीओमुळे नेटकरी संतापले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “त्यांचे लग्न मला इतके बनावट का वाटते?” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “त्यांना लग्न म्हणजे मस्करी वाटत आहे.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “कंटेंटसाठी किती नाटक करतात हे लोकं.”

अविका आणि मिलिंदच्या लग्नाचा एपिसोड येत्या ११ ऑक्टोबरला टीव्हीवर टेलिकास्ट होणार आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.