कलर्स टीव्हीवरची लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू’चा दुसरा सीजन भेटीला येतोय. याची घोषणा कलर्स टीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर केलीय. ही नवी मालिका कधीपासून सुरू होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र या मालिकेची छोटीशी झलक प्रेक्षकांना दाखवण्यात आलीय. या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आलाय. यात ‘बालिका वधू २’ मधल्या छोट्या आनंदीला दाखवण्यात आलंय.
कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या या नव्या प्रोमोमध्ये एका लहान मुलीला बालिका वधूच्या रूपात दाखवण्यात आलंय. यात नव्या नवरीच्या वेशभूषेत असलेली ही लहान मुलगी आपल्या ओढणीचे पंख बनवत मिरवताना दाखवण्यात आलीय. काही दिवसांपूर्वी कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या पहिल्या प्रोमोमध्ये आनंदीची भूमिका कोण साकारणार हे गुलदस्त्यात ठेवलं होतं. मात्र यंदाच्या प्रोमोमध्ये त्यांनी नव्या सीजनच्या छोटी आनंदीची झलक दाखवली आहे. ‘बालिका वधू २’ मधून भेटीला येणारी ही छोटी आनंदी श्रेया पटेल आहे. या सीजनमध्ये सुद्धा ही छोटी आनंदी बाल विवाह सारख्या प्रथांविरोधात आवाज उठवताना दिसून येणार आहे. सध्या या मालिकेचं शूटिंग राजस्थानमध्ये होतंय. ही मालिका ऑगस्टमध्ये सुरू होईल, असं बोललं जातंय.
पुन्हा एकदा बाल विवाह विरोधात लढणार आनंदी!
कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये मालिकेचे बॅकग्राउंड थीम सॉंग ऐकायला मिळतंय. यासोबत प्रोमोमध्ये एक वॉईस ओव्हर दिला गेलाय. यात आनंदीचा उल्लेख करताना म्हटलंय, “पुन्हा एकदा समाजात होणाऱ्या बाल विवाहाच्या प्रथेविरोधात लढणार आनंदी…” हा प्रोमो शेअर करताना कलर्स टीव्हीने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “बाल विवाह ही एक कुप्रथा आहे जी आजही समाजात जिवंत आहे. याला मिटवण्यासाठी भेटीला येतेय एक नवी आनंदी…एक नवी बालिका वधू…लवकरच येतेय कलर्स टीव्हीवर….”
१० वर्षाहूनही लहान आहे नवी आनंदी
या प्रोमोमधली नवी आनंदी श्रेया पटेल ही आधीच्या सीजनमध्ये आविका गौरने साकारलेल्या छोट्या आनंदीपेक्षाही खूप लहान दिसून येतेय. ज्यावेळी अविका गौरने बालिका वधूचा पहिला सीजन साईन केला होता, त्यावेळी ती अवघ्या १० वर्षांची होती. यावरून यंदाच्या सीजनमधली छोटी आनंदी श्रेया पटेल ही १० वर्षांपेक्षा ही लहान असल्याचं बोललं जातंय.
२१ जुलै २००८ मध्ये ‘बालिका वधू’चा पहिला एपिसोड ऑन एअर झाला होता. त्यानंतर जवळजवळ आठ वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि २०१६ साली ही मालिका ऑफ एअर झाली. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेच्या दुसऱ्या सीजनसाठी प्रेक्षक मागणी करत होते. त्यामुळे मेकर्स पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. त्यामूळे या मालिकेतली नवी आनंदी प्रेक्षकांना किती भावतेय, हे पाहणं महत्वाचं ठरणारेय.