छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ च्या तिसऱ्या पर्वाचे विजेतपद विशाल निकम याने पटकावले. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरु असताना अनेकदा विशालने सौंदर्या हिचा उल्लेख केला होता. त्यामुळे विशालची ही सौंदर्या नेमकी कोण? असा प्रश्न अनेकांनी त्याला विचारला होता. दरम्यान नुकतंच विशालने त्याच्या सौंदर्याबद्दल एक पोस्ट केली आहे.
विशाल निकम हा इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावर त्याने सौंदर्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती चाहत्यांना दिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमधून त्याने चाहत्यांना एक कळकळीची विनंतीही केली आहे.
“मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, योग्य वेळ आल्यावर आणि काही खासगी गोष्टी सुरळीत झाल्यावर स्वत:हून सौंदर्याचं नाव सांगेल. ती एक सामान्य मुलगी असून, अभिनयसृष्टीशी तिचा काही एक संबंध नाही. त्यामुळे इंडस्ट्रीतील कोणत्याही व्यक्तीसोबत माझं नाव कृपया जुळवू नका! कारण यामुळे विनाकारण त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो हे लक्षात घ्या आणि प्लीझ धीर धरा…मला थोडा वेळ द्या,” अशी विनंती विशालने केली त्याच्या चाहत्यांना केली आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनेक नेटकऱ्यांनी विशाल निकमच नाव अभिनेत्री अक्षया हिंदळकरसोबत जोडलं होतं. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते. त्याशिवाय हे फोटो व्हायरल करुन हीच विशालची सौंदर्या तर नाही ना? असा प्रश्नही विचारला जात होता. तर अनेकांनी अक्षया हीच विशालची सौंदर्या आहे, असे सांगितले होते.
विशाल आणि अक्षयानं ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम केलं आहे. हे फोटो मालिकेतील आहे. या गोष्टीवर आता विशाल निकमने आक्षेप घेत चाहत्यांना थांबण्यासाठी विनंती केली आहे.