Paresh Rawal’s The Taj Story: बॉलिवूडचे अभिनेते परेश रावल यांच्या ‘द ताज स्टोरी’ चित्रपटाला विरोध होताना दिसत आहे. चित्रपटाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. चित्रपटात ऐतिहासिक बाबींची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप वकील शकील अब्बास यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला आता भाजपामधीलच एका नेत्यानेही चित्रपटाला विरोध केला असून यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
भाजपा नेत्याकडून विरोध होण्याचे कारण काय?
अयोध्येतील भाजपा नेते आणि प्रवक्ते रजनीश सिंह यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्डाकडे लेखी तक्रार दाखल करून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. सदर चित्रपट त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या विषयावर आधारित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
रजनीश सिंह यांनी २०२२ साली अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात याचिका दाखल करून ताजमहाल मधील बंद असलेल्या २२ खोल्याचे कुलूप उघडण्याची मागणी केली होती. ताजमहालच्या जागी मुळ मंदिर होते, असा दावा याचिकेत करण्यात आलेला आहे.
याचिकेत म्हटले आहे की, भारतीय पुरातत्त्व विभागाची एक समिती स्थापन करावी आणि १७ व्या शतकातील ताजमहलची तपासणी करण्यात यावी. मात्र उच्च न्यायालयाने मे २०२२ साली सदर याचिका फेटाळून लावली होती.
माझ्या याचिकेचा चित्रपटात उल्लेख
रजनीश सिंह यांनी केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, मी ताजमहलमधील २२ खोल्या उघडण्याची जनहीत याचिका दाखल केली होती. माझा उद्देश इतकाच होता की, यामध्ये पारदर्शकता असावी आणि ऐतिहासिक तथ्य काय आहेत? ते सर्वांसमोर यावेत. मला कळले की, द ताज स्टोरी चित्रपट माझ्या याचिकेवर बेतलेला आहे. चित्रपटाच्या पोस्टर, प्रचाराचे साहित्य आणि चित्रपटाच्या कथेमध्ये हा चित्रपट न्यायालयीन याचिकेवर बेतलेला असल्याचे म्हटले आहे. चित्रपटाचा हा दावा दिशाभूल करणारा आहे. तसेच माझ्या बौद्धिक आणि कायदेशीर हक्कांचे उल्लंघन आहे. तसेच हे करण्यापूर्वी माझी परवानगी घेतलेली नाही, असाही आरोप त्यांनी केला.
रजनीश सिंह पुढे म्हणाले की, अशा चित्रपटामुळे न्यायालयीन प्रक्रियेवर तर परिणाम होईलच त्याशिवाय सामाजिक आणि धार्मिक तणावही निर्माण होऊ शकतो.” त्यांनी सेन्सॉर प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्याची आणि द ताज स्टोरीच्या सार्वजनिक प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी केली. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत चित्रपटाचे प्रमोशन आणि प्रदर्शनावर बंदी घालावी, असेही भाजप नेत्याने म्हटले आहे.
‘द ताज स्टोरी’ हा तुषार अमरीश गोयल लिखित आणि दिग्दर्शित कोर्टरूम ड्रामा आहे. यात परेश रावल, झाकीर हुसेन, अमृता खानविलकर, नमित दास आणि स्नेहा वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
