चीनपासून उद्रेक झालेल्या करोना विषाणूने देशात थैमान घातलं आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना आतापर्यंत या विषाणूची लागण झालाचं पाहायला मिळालं. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनादेखील करोनाची लागण झाली असून आता लोकप्रिय अभिनेता अमित साध यालादेखील करोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या अमित साधने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तो लवकरच करोनाची चाचणी करणार असल्याचं म्हटलं आहे. अमित अलिकडेच ‘ब्रीद :इन शॅडोज’ या वेबसीरिजमध्ये झळकला होता. यात त्याने अभिषेक बच्चनसोबत स्क्रीन शेअर केली होती.
अभिषेक बच्चनची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अमितनेदेखील करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत माझ्याविषयी काळजी वाटल्यामुळे आणि माझ्यासाठी प्रार्थना केल्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार. मी सध्या फिट आहे आणि माझी प्रकृतीदेखील व्यवस्थित आहे. परंतु, आज मी करोनाची चाचणी करण्यासाठी जाणार आहे, असं अमितने म्हटलं आहे.
दरम्यान, ही पोस्ट शेअर करत त्याने अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोन्ही कलाकार लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही केली आहे. अमित आणि अभिषेकने ‘ब्रीद :इन शॅडोज’ या वेबसीरिजमध्ये स्क्रीन शेअर केली होती. यात अमितने कबीर सावंत ही भूमिका साकारली आहे.