तिसऱ्या टप्प्यातील करोना प्रतिबंधक लसीकरणाला राज्यात सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 60 वर्षांवरील आणि 45 ते 59 वर्षे वयोगटातील सहव्याधी असणाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. अनेक सेलिब्रिटीजही ही लस घेताना दिसत आहेत. यातच आता आपल्या अभिनयाने गेल्या काही दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या बॉलिवूडच्या दोन लोकप्रिय सेलिब्रिटींनी करोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे.
दिग्गज अभिनेते अनुपम खेर त्याचसोबत अभिनेत्री नीना गुप्ता यांनी करोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. दोघांनी देखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लस घेतानाचा व्हिडीओ शेअऱ केला आहे.
अभिनेता अनुपम खेर यांनी करोनावरील लस घेतानाचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. याचवेळी त्यांच्या आईने देखील लसीचा पहिला डोस घेतला आहे. लस घेताना स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न अनुपम खेर करत असल्याचं या व्हिडीओत दिसतंय. ते पूर्ण वेळ ‘ओम नम: शिवाय’ असा जप करत होते. लस घेतल्यानंतर कोणती काळजी घ्यावी याबद्दल त्यांनी जाणून घेतलं. यानंतर त्यांनी डॉक्टर, मेडिकल स्टाफ, शास्त्रज्ञ आणि भारत सरकारचे आभार मानले आहेत. अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
तर आपल्या अनोख्या अभिनय शैलीतून कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या नीना गुप्ता यांनी देखील करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. नीना गुप्तांनी लस घेतानाचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केलाय. लस घेताना त्या काहीश्या घाबरल्याचं दिसतंय. “लस घ्यायला आले आहे. खूप भीती वाटतेय.” असं त्या सांगतायत तर लस घेताना त्या एखाद्या लहान मुलाप्रमाणे “मम्मी..मम्मी” बोलत असल्याचं दिसतंय. “लग गया जी तिका.. धन्यवाद” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलंय.
नीना गुप्ता यांच्या व्हिडीओला चाहत्यांकडून पसंती मिळतेय. नीना गुप्ता सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. अनेक मजेशीर व्हिडीओ त्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.