शोले हा सिनेमा हिंदी चित्रपटसृष्टीतला माईलस्टोन आहे. हा सिनेमा सिनेमाचं प्रशिक्षण घेणाऱ्यांना अभ्यासाला देखील आहेत. या चित्रपटाने त्यावेळी सगळे रेकॉर्ड मोडले होते. या सिनेमाचं लिखाण केलं होतं सलीम-जावेद म्हणजेच सलीम खान आणि जावेद अख्तर या सिनेमा लेखकांनी. या दोघांची मुलाखत मनसेने आयोजित केली होती. राज ठाकरे यांनी गब्बरसाठी डॅनीची निवड तुम्ही केली होती मग अमजद खान कसा काय आला? या आशयाचा एक प्रश्न विचारला तेव्हा जावेद अख्तर यांनी अमजद खानची निवड आणि गब्बर हे नाव सुचणं याचा किस्सा सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले जावेद अख्तर?

गब्बर हे नाव कसं आलं तुम्हाला माहीत आहे का? सलीम खान यांचे वडील मोठे पोलीस अधिकारी होते. त्यांचे किस्से मला सलीम खान सांगत असत. एकदा त्यांनी मला गब्बर नावाच्या डाकूचा किस्सा सांगितला. गब्बर नावाचा डाकू होता, तो कुत्रे पाळायचा, असा किस्सा मला सांगितला होता. आम्ही शोले लिहायला बसलो तेव्हा व्हिलनचं नाव काय असेल यावर विचार सुरु होता आणि मला आठवलं मी त्यांना म्हणालो सलीम तुम्ही तो गब्बरचा किस्सा सांगितला होतात. आपल्या सिनेमातल्या व्हिलनचं नाव गब्बर ठेवलं तर? क्षणाचाही विलंब न करता सलीम खान हो म्हणाले. सलीम खान यांनी हे नाव सांगितलं होतं आणि मी सुचवलं आणि शोलेतला व्हिलन गब्बर सिंग झाला.

गब्बरच्या भूमिकेत अमजद खान (फोटो-फेसबुक )

अमजद खानची निवड कशी झाली?

१९६३ मध्ये मी एक युथ फेस्टिव्हल पाहिला होता. तिथे एक नाटक झालं होतं ज्याचं नाव होतं ‘ऐ मेरे वतन के लोगो’ मी त्यात अमजद खानला पाहिलं होतं. मी आणि सलीम खान बरोबर काम करु लागलो तेव्हा मी सलीम खान यांना अनेकदा सांगितलं होतं, की अमजद खान नावाचा एक चांगला मुलगा आहे, चांगलं काम करतो. आम्ही ते विसरलोही होतो. शोले सिनेमासाठी गब्बर म्हणून कुणाला घ्यायचं? यावर आम्ही विचार करु लागलो तेव्हा मला सलीम खान यांनी सुचवलं की तुम्ही एका मुलाची तारीफ करत होतात त्याला बोलवू. आता अमजद खानचं काम मी पाहिलं होतं. पण त्याचं नाव सलीम खान यांनी सुचवलं. तुम्हाला मी जे दोन प्रसंग सांगितले त्यावरुन आमचं ट्युनिंग कसं होतं ते तुम्हाला कळलं असेल असंही जावेद अख्तर म्हणाले.

डॅनीची निवड का झाली नाही?

गब्बरच्या भूमिकेसाठी आम्ही डॅनीची निवड केली होती. मात्र त्याने धर्मात्मा सिनेमासाठी तारखा दिल्या होत्या. आता शोले करावा की धर्मात्मा हा प्रश्न त्याच्यापुढे होता. धर्मात्माचं शुटिंग अफगाणिस्तानमध्ये होणार होतं. डॅनीला वाटलं आऊटडोअर शुटिंग आहे आपण तिकडे जावं म्हणून तो तिकडे गेला. असंही जावेद अख्तर यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How did the name gabbar come about and how was amjad khan selected salim javed tell the story of sholay scj