अभिनेत्री कंगना रणौतने अभिनेता रणबीर कपूर आणि चित्रपट निर्माता करण जोहर यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली आहे. तिने या दोघांना सुशांत सिंह राजपूतच्या निधनासही जबाबदार धरलं आहे. या दोघांनी सुशांतबद्दल नकारात्मक गोष्टी व अफवा पसरवल्याचा दावाही कंगनाने केला आहे. तिने या दोघांचा दुर्योधन व शकुनी असा उल्लेख केला.
हेही वाचा – मसाबा गुप्ताच्या पूर्वाश्रमीच्या पतीने केलं दुसरं लग्न, मधू मंटेना-इरा त्रिवेदीच्या लग्नाचे फोटो व्हायरल
कंगना रणौत इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत म्हणाली, “काल केलेल्या गोष्टी मी पुढे नेत आहे. या चित्रपटसृष्टीत अनेक वाईट गोष्टी आहेत, परंतु त्यापैकी सर्वात वाईट म्हणजे दुर्योधन (पांढरा उंदीर) आणि शकुनी (पापा जो) यांची जोडी होय. ते लोक स्वत: मान्य करतात की त्यांना इतर लोकांबद्दल खूप मत्सर वाटतो. ते सर्वात जास्त गॉसिप्स करतात आणि स्वतःबद्दल असुरक्षित होतात. ते स्वत:ला फिल्म इंडस्ट्रीतील गॉसिपचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय म्हणतात. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात हे दोघे खरे दोषी आहेत, हे संपूर्ण चित्रपटसृष्टीला माहीत आहे. या लोकांनी त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले. त्यांनी माझ्याविरुद्ध अनेक चुकीच्या गोष्टीही पसरवल्या आहेत आणि माझ्या आणि हृतिकच्या भांडणात जबरदस्तीने हस्तक्षेप करून पंचाची भूमिका घेतली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत माझे आयुष्य आणि करिअर उद्ध्वस्त करत आहेत,” असं तिने स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने पोहोचला कोकणातील गावी, त्याचं टुमदार कौलारू घर पाहिलंत का?
कंगनाने पुढे लिहिलं, “मी या गोष्टी तुमच्यासमोर आणत आहे, त्यामुळे माझ्या चित्रपटांविरोधात एक पीआर टीम काम करत आहे. पण, आज मी शपथ घेते की, जेव्हा जेव्हा मी सत्य बाहेर आणण्याच्या स्थितीत असेन तेव्हा मी ते नक्कीच उघड करेन. हे लोक डार्क वेब, हेरगिरी, हॅकिंग अशा कोणत्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत, हेही सर्वांना सांगेन. मी बऱ्याच काळापासून याबद्दल बोलत आहे. आता यांचे स्वत:चे करिअर बुडत असल्याने त्यांनी इतरांऐवजी आपल्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. नाहीतर या इंडस्ट्रीत या लोकांसोबत काम करणं खूप कठीण झालं असतं.”
कंगना पुढे म्हणाली, “आता या लोकांकडे पैसे नाहीत. माध्यमांचे महत्त्वही आता खूप कमी झाले आहे कारण आता फक्त सोशल मीडिया उरला आहे. अशा परिस्थितीत सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाउंट बातम्यांचे स्रोत बनले आहेत. समाजातील या नवीन बदलामुळे माझा आवाज पूर्वीपेक्षा अधिक ऐकू येत आहे. मी याआधी खूप बोलले आहे पण ते ऐकलं जायचं नाही. माझ्या विरोधात माझ्याच विधानांचा वापर करण्यात आला, मीडियाला त्यासाठी चांगला मोबदला दिला गेला. पण त्यानंतर बॉलीवूडच्या ग्रेट फॉलचा काळ आला, त्यांचे साम्राज्य कोसळले. आता एक नवीन सामूहिक भारतीय चित्रपट उद्योग उदयास येत आहे जो लोकशाही आणि समानतेच्या तत्त्वावर चालतो.”