Reha Chakraborty : अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट अर्थात अंतिम अहवाल न्यायालयात सादर केला आहे. या अहवालात रिया चक्रवर्तीला क्लिन चिट देण्यात आली आहे. याबाबत आता रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाल्याचं क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद

अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह १४ जून २०२० ला त्याच्या निवासस्थानी आढळून आला होता. सदर मृत्यूचं प्रकरण प्रथमदर्शनी आत्महत्या वाटत असली तरीही काही बाबींबाबत संशय निर्माण होत असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं. आता सीबीआयने या प्रकरणात जो अंतिम अहवाल सादर केला आहे त्यात सुशांतच्या मृत्यूचं कारण आत्महत्या आहे असंच नमूद करण्यात आलं आहे.

सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केल्याने रिया चक्रवर्तीवर कारवाई

सुशांत सिंगचे वडील के के सिंग यांनी रिया चक्रवर्ती ( Reha Chakraborty ) विरोधात सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कोणताही कट कारस्थान नसल्याचा दावा सीबीआयने केला असून रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लिन चिट दिली आहे.

रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे काय म्हणाले?

“सीबीआयच्या अंतिम अहवालात रियाला ( Reha Chakraborty ) क्लिन चिट देण्यात आली आहे. या निर्णयाचं मी स्वागत करतो. मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की रिया ( Reha Chakraborty ) निर्दोष आहे. तिला या प्रकरणात खूप त्रास सहन करावा लागला. पण रिया एखाद्या वाघिणीसारखी लढली. मी तिला सॅल्युट करतो. सत्याचा विजय होईल हे मी तेव्हाही म्हटलं होतं आजही मला हेच वाटतं आहे की सत्याचा विजय झाला.” असं सतीश मानेशिंदे यांनी म्हटलं आहे. आज तक या वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना त्यांनी हे विधान केलं आहे.

रिया चक्रवर्ती आणि सुशांत (संग्रहीत फोटो)

रियाला प्रचंड त्रास सहन करावा लागला-सतीश मानेशिंदे

रिया ( Reha Chakraborty ) सुशांतच्या मृत्यूच्या सहा दिवस आधीच त्याच्या घरातून निघून गेली होती. त्यानंतर पुढचे सहा दिवस ती त्याच्या संपर्कात नव्हती. मला माहीत नाही की रियाला या सगळ्या प्रकरणात कशाच्या आधारावर खेचण्यात आलं. लोकांनी जे नरेटिव्ह पसरवलं आणि चालवलं ते पूर्णपणे चुकीचं होतं हे सीबीआयच्या अहवालाने सिद्ध केलं आहे. रिया चक्रवर्ती ( Reha Chakraborty ) पहिल्या दिवसापासूनच निर्दोष होती. मात्र ती वाघिणीप्रमाणे लढली. मी तिला बंगालची वाघीण म्हणत होतो. रियाबाबत मी पहिल्या दिवसापासून हेच सांगत होतो की दोषी नाही. सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियावरुन तिच्याबाबत अनेक खोट्या बातम्या केल्या गेल्या. तिला या सगळ्याचा प्रचंड त्रास झाला पण तो तिने सहन केला असंही सतीश मानेशिंदे यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reha chakraborty lawyer satish maneshinde said this thing about her after cbi closer report in sushant death case scj