‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून सध्या अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परंतु दुसरीकडे या कॉन्ट्रोव्हर्सीचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येत आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी जादुई आकडा गाठत १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. अनेक राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी असूनही बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची पसंती मिळाल्याने, काही दिवसांतच ‘द केरला स्टोरी’ला १०० कोटींचा गल्ला जमवण्यात यश आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने अवघ्या ९ दिवसांमध्ये ११२.९९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह-जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले या कथेवर हा संपूर्ण चित्रपट आधारलेला आहे, असा दावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला होता. यामुळे देशभरात या चित्रपटावरून वाद सुरू झाला होता, तर काहींनी चित्रपटाचे कौतुकही केले.

आणखी वाचा : “माझ्या आयुष्याची वाताहत…” पीयूष मिश्रा यांची ‘कम्युनिझम’वर सडकून टीका

कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘पठाण’चेही काही रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आता ‘द केरला स्टोरी’ची घोडदौड १५० कोटींच्या दिशेने सुरू झाली आहे. मीडिया रीपोर्टनुसार चित्रपटाच्या दुसऱ्या आठवड्याच्या सोमवारीही याने उत्तम कमाई केली आहे. रविवारी या चित्रपटाने १६.४० कोटी तर सोमवारी १० कोटींची कमाई केली आहे. हे आकडे बघता मंगळवारचे आकडे यात जोडायचे म्हंटलं तर या चित्रपटाची कमाई १४० कोटींच्या पुढे केव्हाच गेली आहे.

लवकरच हा चित्रपट १५० कोटींचा टप्पाही गाठणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट चांगलाच उचलून धरला आहे. शाहरुख खानचा ‘पठाण’, रणबीरचा ‘तू झुठी में मक्कार’ आणि सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटानंतर कोणताही नावाजलेला स्टार नसलेल्या ‘द केरला स्टोरी’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. असाच प्रतिसाद मिळत राहिला, तर पुढील काही दिवसांमध्ये चित्रपटाची एकूण कमाई २०० कोटींहून अधिक होऊ शकते, अशी शक्यताही काही चित्रपट विश्लेषकांनी वर्तवली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kerala story box office collection day 11 soon it will cross 150 crore mark avn