Rekha Entry at Rishi-Neetu Kapoor Wedding : रेखा व अमिताभ बच्चन यांच्या एकेकाळच्या अफेअरची आजही बॉलीवूडमध्ये चर्चा होत असते. खरं तर अमिताभ बच्चन व जया भादुरी रिलेशनशिपमध्ये होते, त्यावेळी जया यांच्या घरी रेखा व बिग बींची पहिली भेट झाली होती. जया, अमिताभ व रेखा एकत्र लाँग ड्राइव्हला जायचे, इतकी घट्ट मैत्री त्यांच्यात झाली होती. पण नंतर रेखा व अमिताभ बच्चन यांच्यातील जवळीक वाढली. रेखा तर त्यांचं अमिताभ यांच्यावरील प्रेम जाहीरपणे व्यक्त करायच्या.

अमिताभ बच्चन व जया यांच्या लग्नानंतर एकदा रेखा यांच्यामुळे जया यांना अश्रू अनावर झाले होते. तो दिवस होता २२ जानेवारी १९८०. ऋषी कपूर आणि नंतर नीतू सिंह ही पडद्यावरील लोकप्रिय जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र येत होती. दोघांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा झाली होती. या लग्नाला हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांनाही निमंत्रण होतं, ते जोडीने लग्नाला आले होते. त्यावेळी तिथे रेखा यांची एंट्री झाली आणि सगळे त्यांच्याकडेच पाहत राहिले होते.

नेमकं काय घडलं होतं?

रेखा यांनी एक सुंदर पांढरी साडी नेसली होती. त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर लाल टिकली होती आणि त्यांच्या भांगेत सिंदूर होतं. रेखा यांची एंट्री होताच लग्नातील फोटोग्राफर्सनी तिकडे मोर्चा वळवला. सिने ब्लिट्झच्या एका रिपोर्टमध्ये त्या रात्री काय घडलं होतं, त्याबद्दल तपशीलवार सांगण्यात आलं होतं. रेखा आरके स्टुडिओत कशा चालत गेल्या, कशा उभ्या राहिल्या? याचे वर्णन त्यात केले होते. तिथे रेखा वारंवार अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहत होत्या. अमिताभ दिग्दर्शक मनमोहन देसाईंशी बोलत होते. काही वेळाने रेखा अमिताभजवळ गेल्या आणि त्यांच्याशी बोलू लागल्या.

अमिताभ व रेखा एकमेकांशी बोलत होते, पण इकडे जया अस्वस्थ झाल्या होत्या. स्टारडस्ट मॅगझिनच्या वृत्तानुसार, “जया यांनी बराच वेळ शांत राहण्याचा प्रयत्न केला, पण अखेर त्यांना मान खाली घालावी लागली. खाली बघताच जया यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.” हा प्रसंग यासर उस्मान यांनी रेखा: द अनटोल्ड स्टोरी नावाच्या पुस्तकात सांगितला आहे.

रेखा यांनी नंतर दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. सिंदूर आणि मंगळसूत्र हे चित्रपटाच्या शूटिंगसाठी घातलं होतं. सेटवरून थेट लग्नाला जाताना ते काढायला विसरल्याचं रेखा म्हणाल्या होत्या.