बॉलिवूड स्टार सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या आगामी ‘टायगर ३’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान आणि कतरिना नुकतेच चित्रपटाच्या शूटिंगसाठी रशियाला रवाना झाले आहेत. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यात सलमान विमानतळावर दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अधिक चर्चा सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विमानतळावरील केंद्रीय सुरक्षा दलाच्या (CISF) जवानाची होत आहे. या जवानाने सलमान खानला चौकशीशिवाय आत जाण्यापासून रोखले.
जेव्हा सलमान खान विमानतळावर पोहचला तेव्हा त्याच्याभोवती लोक जमा झाले होते. दरम्यान, सलमान आपल्या सुरक्षेसह विमानतळाच्या आत जाऊ लागला. व्हिडीओमध्ये असते दिसते की, सलमान आत जायला निघाला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सीआयएसएफ जवानाने त्याला सुरक्षा तपासणीसाठी थांबवले. तपासल्यानंतर सलमान खानची एंट्री झाली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून लोक सीआयएसएफ जवानाचे खूप कौतुक करत आहेत.
या व्हिडिओमध्ये सलमान खान खूप शांत दिसत आहे आणि हळूहळू त्याच्या टीमसोबत पुढे जात आहे. या दरम्यान, फोटोग्राफर त्याच्याकडे पोज देण्याची विनवणी करत आहेत. सलमानने कोणालाही निराश केले नाही. सलमान खानच्या या व्हिडिओवर लोक मोठ्या प्रतिक्रिया देत आहेत आणि अभिनेत्यासह सीआयएसएफ अधिकाऱ्याचे कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, “सीआयएसएफ जवानाने सलमानला ज्या प्रकारे रोखले ते पाहून छान वाटले.” तर दुसर्याने लिहिले की, “सीआयएसएफ जवान देखील स्टार सारखा दिसतो.”
सलमान खान ‘टायगर ३’ चे रशियात सुमारे २ महिने शूट करणार आहे. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर टायगर फ्रँचायझीचा हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना आणि इमरान हाश्मी देखील दिसणार आहेत. इम्रान या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत आहे. सलमान शेवटचा ‘राधे’ मध्ये दिसला होता. आगामी काळात तो ‘कभी ईद कभी दिवाली’ आणि ‘अंतिम’ सारख्या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.
