Complaint Against Tollywood Veteran Mohan Babu : दाक्षिणात्य अभिनेत्री सौंदर्या ही सूर्यवंशम या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. सौदर्या आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट चर्चेत राहिला होता. त्यानंतर बातमी आली ती सौंदर्याच्या मृत्यूची. अभिनेत्री सौंदर्याचा विमान अपघातात मृत्यू झाल्याने सगळ्याच मनोरंजन विश्वाला धक्का बसला होता. आता तो अपघाती मृत्यू नाही तर हत्या होती हत्येचा कट अभिनेते मोहन बाबू यांनी आखला होता असा आरोप होतो आहे. हे प्रकरण नेमकं काय आपण जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहनबाबू यांच्यावर सौंदर्याच्या हत्येच्या कटाचा आरोप कुणी केला आहे?

चिट्टीमल्लू नावाच्या एका व्यक्तीने अभिनेत्री सौंदर्याची हत्या ही अभिनेते मोहन बाबू यांनी घडवून आणली असा आरोप केला आहे. मालमत्तेच्या वादातून मोहन बाबू यांनी सौंदर्याची हत्या घडवून आणल्याचं त्याने म्हटलं आहे. सौंदर्या आणि तिच्या भावावर मोहन बाबूने जमीन विकण्यासाठी दबाव आणला होता. मात्र त्यांनी जमीन विकण्यास नकार दिला. त्यामुळे मोहन बाबू यांनी सौंदर्याची हत्या घडवून आणली आणि त्यानंतर त्या जमिनीवर बेकायदा कब्जा केला असाही आरोप चिट्टीमल्लू यांनी केला.

चिट्टीमल्लू यांनी काय म्हटलं आहे?

तक्रारकर्ते चिट्टीमल्लू यांनी आपल्याला सुरक्षा पुरवली जावी ही प्रमुख मागणी केली आहे. तसंच मोहन बाबू यांच्या आपल्याला धोका आहे. त्यांनी सौंदर्याची ६ एकर जमीन बळकवण्यासाठी तिची हत्या घडवून आणली. आपल्याला काही होऊ नये म्हणून आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी असं म्हटलं आहे.

सौंदर्याचा मृत्यू कसा झाला?

२००४ मध्ये सौंदर्याने राजकारणात पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने सुरुवातीला भाजपा आणि नंतर तेलगु देसम पक्षात प्रवेश केला. करीमनगर या ठिकाणी ती एका राजकीय प्रचारसभेसाठी जात होती. त्यावेळी तिच्यासह तिचा भाऊ अमरनाथही होता. हे चार सीटर चार्टर विमान होतं. १०० फूट उंचीवर जाताच विमानाला आग लागली आणि ते खाली कोसळलं. या घटनेत अभिनेत्री सौंदर्या, तिचा भाऊ अमरनाथ, हिंदू जनजागरण समितीचे सचिव रमेश कदम आणि जॉय फिलिप या चौघांचाही जळून मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

त्यावेळी हा अपघात आहे हे सांगण्यात आलं होतं. हे विमान बंगळुरुतल्या गांधी कृषी विज्ञान केंद्राच्या परिसराजवळ कोसळलं होतं. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार लोक तातडीने मदतीसाठी पोहचले होते. पण विमान जळून खाक झालं होतं आणि विमानत बसलेल्या चौघांचा जळून मृत्यू झाला.

मृत्यूच्या वेळी गरोदर होती सौंदर्या

सौंदर्याच्या मृत्यूनंतर तमिळ दिग्दर्शक आ. व्ही. उदयकुमार यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की सौंदर्या तिच्या मृत्यूच्या वेळी गरोदर होती. सौंदर्याने मला एक दिवस आधीच हे सांगितलं होतं की ती आई होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तिच्या मृत्यूची बातमीच समोर आली. आम्ही एक तास फोनवर बोलत होतो, तिने मला हेदेखील सांगितलं होतं की मी आता चित्रपटांमध्ये काम करणार नाही कारण मी गरोदर आहे आणि मला मातृत्व अनुभवायचं आहे.

सौंदर्याला मृत्यूपश्चातही मिळाला कामासाठी पुरस्कार

सौंदर्या ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री होती. १९९५ मध्ये तिला अमोरु या तेलुगु चित्रपटासाठी तिला तेलुगु फिल्मफेअर अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं होतं. तसंच तिला उत्तम अभिनयासाठी त्यानंतर नऊ फिल्मफेअर अवॉर्ड देण्यात आले होते. तिच्या मृत्यूनंतरही अपथामित्रा या चित्रपटासाठी तिला पुरस्कार मिळाला होता. सौंदर्याच्या मृत्यूमुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. आता तिचा मृत्यू अपघाती नसून हत्या होती असा आरोप होतो आहे. यामागचं सत्य लवकरच बाहेर येईल यात काही शंका नाही. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint against tollywood actor mohan babu 22 years after death of actress soundarya main disc news scj