करोना व्हायरसमुळे सध्या अनेकांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. मालिका, चित्रपटांचं शूटिंग बंद असल्याने अनेक स्पॉट बॉय आणि फिल्म लाइन कामगारही आर्थिक संकटात आहे. चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या या कामगारांसाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुढे सरसावला असून मदतीचा हात दिला आहे. सलमान खानने १६ हजार कामगारांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली आहे.

सलमान खानने चित्रपटसृष्टीतीला २५ हजार कामगारांना मदत करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार त्याने मदत करण्यास सुरुवात केली आहे. सलमान खानने सध्या १६ हजार कामगारांच्या खात्यात एकूण चार कोटी ८० लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत. आगामी दिवसांमध्ये परिस्थिती पाहता पुढील महिन्यात ही मदत वाढवली जाणार आहे. तसंच सलमान खान मे महिन्यात आणखी १९ हजार कामगारांना मदत करणार आहे.

सलमान खानने आपण चित्रपटष्टीतील कामगारांना १० कोटी ५० लाख रुपयांची मदत करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यातील पहिल्या टप्प्यात त्याने १६ हजार कामगारांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये ट्रान्सफर केले आहेत. दुसऱ्या टप्प्यात सलमान खान १९ हजार कामगारांना मदत करणार असून पाच कोटी ७० लाख रुपये खर्च करणार आहे.