‘दंगल’ या चित्रपटातील बिहाइंड द सीन्सचा एक व्हिडिओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री साक्षी तन्वर ‘दंगल’ चित्रपटामध्ये तिचा काम करतानाचा अनुभव शेअर करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा व्हिडिओ आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. ते म्हणजे साक्षीच्या हातातील अंगठी. चित्रपटात काम करतानाचा अनुभव सांगत असताना अनेकांचेच लक्ष साक्षीच्या डाव्या हातातील अंगठीवर जात आहे. याच अंगठीमुळे साक्षीने खासगीपणे तिचा साखरपुडा उरकून घेतल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. पण, त्याबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती हाती आलेली नाही. असे असले तरीही ही अंगठी विविध प्रश्न उभे करत असल्याचेच म्हटले जात आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून टेलिव्हिजन विश्वात साक्षी एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नावारुपास आली आहे. तिच्या काही भूमिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. व्यावसायिक जीवनात साक्षी समर्पितपणे काम करते पण, तिचे खासगी आयुष्यही गुलदस्त्यात आहे. काही दिवसांपूर्वी साक्षीने एका व्यावसायिकाशी लग्न केल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. पण, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत या केवळ अफवा असल्याचे साक्षीने स्पष्ट केले होते. त्यामुळे आता साक्षीच्या हातात असलेल्या त्या अंगठीमागचे रहस्य काय? हे तर फक्त साक्षीच जाणते.

पाहा: VIDEO: आमिरच्या आईमुळेच झाली ‘दंगल’साठी साक्षीची निवड

दरम्यान, आमिर खान याच्या बुचर्चित ‘दंगल’ या चित्रपटामध्ये साक्षी तन्वर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या उद्देशाने प्रदर्शित करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये ‘दंगल’चे दिग्दर्शक नितेश तिवारी आणि अभिनेता आमिर खान यांनी साक्षीच्या कामाची प्रशंसा केली आहे. तसेच या व्हिडिओमध्ये ‘दंगल’ या चित्रपटासाठी साक्षीची निवड कशी झाली ते स्वत: साक्षीच सांगत आहे. व्हिडिओमध्ये साक्षीच्या मेकअपपासून ते अगदी तिच्या हरयाणवी भाषेच्या अंदाजापर्यंत सर्व अनुभव साक्षीने शेअर केले आहेत. ‘या चित्रपटासाठी मला एकदा फोन आला. पण त्यावेळी मला कोणीतरी माझी मस्करी करत आहे असेच वाटले’, असे साक्षी म्हणाली. तर, आमिरने साक्षीची या चित्रपटात निवड कशी करण्यात आली यावरुन पडदा उचलला आहे. आमिर खानची आई टिव्ही जास्त पाहते, त्यामुळे ‘दंगल’ या चित्रपटामध्ये साक्षीची निवड करण्यासाठी आमिरच्या आईची महत्त्वाची भूमिका आहे असेच म्हणावे लागेल. २३ डिसेंबरला आमिरचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.