वेगवेगळ्या भूमिका साकारत पावलो पावली आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सगळ्यांची मने जिंकली आहेत. नीना गुप्ता यांचा चाहता वर्ग ही मोठा आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटानं नीना गुप्ता यांची लोकप्रियता आणखी वाढली. नीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या नेहमीच त्यांचे विचार मांडताना दिसतात. त्यांचा एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्यांनी एका लग्न झालेल्या माणसावर प्रेम का करू नये हे सांगितले आहे.
हा व्हिडीओ नीना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत नीना कूल लूकमध्ये दिसत आहे. “जेव्हा एखादा विवाहीत पुरूष कोणत्या महिलेच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तो म्हणतो माझं आणि माझ्या पत्नीचं पटत नाही आणि मग त्यांना पत्नीपासून विभक्त होण्याचा सल्ला आपण देतो. पण तेव्हा हे पुरूष त्यांच्या मुलांचं कारण सांगतात. सुरुवातीला ओळख, त्यानंतर प्रेमात पडणं, फिरायला जाणं, एकत्र वेळ व्यतीत करणं इथपर्यंत हे नातं येऊन पोहोचतं. पुढे अर्थातच तुमच्या अपेक्षा वाढतात आणि तुम्ही जेव्हा ‘त्या’ व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करता तेव्हा मात्र त्यांच्या उत्तराने तुम्हाला धक्का बसतो,” असे नीना त्या व्हिडीओमध्ये म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, “लग्नाचा विषय निघाला तर तो पुरुष विषय बदलतो किंवा म्हणतो मी या सर्व गोष्टी करू शकत नाही. आपलं जे काही आहे ते इथेचं थांबवूया. तो तुमच्यासोबत राहण्यास नकार देतो, तेव्हा तुम्ही काय कराल? या सर्व परिस्थितींचा अनुभव मी माझ्या आयुष्यात घेतला आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक सल्ला देते की कधीच विवाहीत पुरूषाच्या प्रेमात पडू नका.”
नीना गुप्ता या वेस्ट इंडिज क्रिकेट संघातील प्रख्यात खेळाडू सर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यांनी रिचर्ड्स यांच्याशी लग्न केलं नाही, पण या दोघांची एक मुलगी आहे. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता ही नीना यांचीच मुलगी.