यूपीएससी ही सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात, त्यापैकी काहींना यश मिळतं. काही उमेदवार पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करतात, तर काहींना मात्र बरीच वर्षे मेहनत घेतल्यानंतर यश मिळतं. वारंवार अपयश आल्याने यूपीएससी सोडून इतर क्षेत्रात करिअर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पण एक अभिनेत्री यशाच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडून आयएएस झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एचएस कीर्तना असे या अभिनेत्रीचे नाव आहे. ती कमी वयातच अभिनय क्षेत्रात काम करू लागली. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने फिल्म इंडस्ट्री सोडली आणि सरकारी अधिकारी व्हायचं ठरवलं. आयएएस एचएस कीर्तनाच्या (IAS HS Keerthana Story) यशाची गोष्ट जाणून घेऊयात.

कोण आहे एचएस कीर्तना?

एचएस कीर्तना कन्नड अभिनेत्री होती. तिने चौथ्या वर्षी अभिनयविश्वात पाऊल ठेवलं. तिने अनेक कन्नड चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं. कर्पूरदा गोम्बे, गंगा-यमुना, मुद्दिना आलिया, उपेंद्र, ए, कनूर हेग्गदती, सर्कल इन्स्पेक्टर, ओ मल्लिगे, लेडी कमिशनर, हब्बा, दोरे, सिंहाद्री, जननी, चिगुरु आणि पुतनी एजंट या कलाकृतींचा ती भाग राहिली. पण करिअरच्या शिखरावर असताना तिने चित्रपटसृष्टी सोडली.

एच एस कीर्तनाचा जन्म कर्नाटकमधील तुमकुर जिल्ह्यातील होस्केरे गावात झाला, नंतर ती बंगळुरूला आली आणि शिक्षण पूर्ण करतानाच अभिनय करू लागली. तिने इंजिनिअरींगची डिग्री घेतली. कीर्तनाचे वडील श्रीनिवास एचटी यांची इच्छा होती की लेकीने सरकारी अधिकारी व्हावं आणि हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने अभिनयाला अलविदा केलं.

कीर्तनाने १५ व्या वर्षांपर्यंत चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं, त्यानंतर आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभिनयविश्व सोडले. २०११ मध्ये ती कर्नाटकमधील प्रशासकीय सेवा परीक्षा (KAS) उत्तीर्ण झाली. दोन वर्षे तिने अधिकारी म्हणून काम केलं. त्यानंतर २०१३ मध्ये तिने पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली, पण तिला अपयश आलं. तिने नंतर २०१७ पर्यंत चार वेळा परीक्षा दिली, पण ती अयशस्वी ठरली. या काळात ती नोकरी व घरातील जबाबदाऱ्या सांभाळत राहिली.

सहाव्या प्रयत्नात मिळालं यश

एचएस कीर्तनाने २०१८ मध्ये यूपीएससीच्या परीक्षेची गांभीर्याने तयारी सुरू केली. त्यासाठी तिने बंगळुरूत कोचिंग घेतले. सरकारी नोकरी सोडून अभ्यास करू लागली, पण तरीही २०१८ मध्ये ती प्रिलिम्स पास होऊ शकली नाही. त्यानंतर सहाव्या प्रयत्नात २०१९ मध्ये ती आयएएस झाली. ती आपल्या यशाचं श्रेय आई-वडील, भाऊ आणि पती दिलीप यांना देते.

आयएएस एचएस कीर्तना सध्या कुठे आहे?

आयएएस एचएस कीर्तना सध्या मांड्या जिल्ह्यात असिस्टंट कमिश्नर या पदावर कर्तव्य बजावत आहे. ही तिची पहिली पोस्टिंग आहे. तिने बंगळुरूत विशेष नोडल अधिकारी म्हणूनही काम पाहिलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous actress hs keerthana who left acting became ias officer success story hrc