दक्षिण कोरियातील लोकप्रिय अभिनेत्री कांग सेओ-हा हिचे निधन झाले आहे. पोटाच्या कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर तिची प्राणज्योत मालवली. कांग सेओ-हा ३१ वर्षांची होती. आज (१४ जुलै २०२५ रोजी) स्थानिक माध्यमांनी तिच्या निधनाचे वृत्त दिले आहे.
केबीआयझूमच्या वृत्तानुसार, कांग सेओ-हा हिच्यावर बानपो-डोंग येथील सियोल सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कांग सेओ-हा हिची अंत्ययात्रा बुधवारी, १६ जुलै रोजी सकाळी ७:४० वाजता (कोरियातील वेळेनुसार) सुरू होईल. सियोल मेमोरियल पार्कमधून तिचे पार्थिव नेले जाईल आणि नंतर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती झापझी वेबसाईटने दिली आहे.
कांग सेओ-हा हिच्या कुटुंबातील एका सदस्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून तिला श्रद्धांजली वाहिली. या व्हिडीओत तिच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या व्हिडीओबरोबर एक भावनिक कॅप्शन देण्यात आलंय. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, “मला अजूनही विश्वास बसत नाहीये, उन्नी. इतक्या प्रचंड वेदना सहन करत असतानाही, तू तुझ्या आजूबाजूच्या लोकांबद्दल आणि माझ्याबद्दल काळजी करत होतीस. तू अनेक महिने जेवू शकली नव्हती, तरी तू माझ्या जेवणाचा खर्च स्वतः करण्याचा आग्रह धरायचीस. माझ्या जेवणाबद्दल तू नेहमी काळजी करायचीस. आमची परी, तू आम्हाला खूप लवकर सोडून गेलीस. औषधांच्या मदतीने तू खूप काही सहन केलंस तरीही, तरीही तू परिस्थिती फार वाईट नसण्याबद्दल कृतज्ञ होतीस. माझी प्रिय बहीण, तू खूप काही सहन केलंस. मला आशा आहे की तू आता जिथे आहेस तिथेच आनंदी असशील आणि तुला त्रास होत नसेल,” असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ-
कांग सेओ-हा ही ‘स्कूलगर्ल डिटेक्टिव्ह्ज’, ‘फ्लॉवर्स ऑफ द प्रिझन’ आणि ‘नोबडी नोज’ सारख्या लोकप्रिय कोरियन ड्रामांमधील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. कांग सेओ-हा हिला पोटाचा कॅन्सर होता आणि उपचार सुरू होते, त्यादरम्यानही ती नाटकांमध्ये काम करत होती. तिने पार्क ग्यू-यंगबरोबर ‘इन द नेट’ या तिच्या शेवटच्या प्रोजेक्टचं शूटिंग पूर्ण केलं होतं.
कांग सेओ-हा ही दक्षिण कोरियातील मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री होती. तिच्या निधनाने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. तिचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट करून तिला श्रद्धांजली वाहत आहेत.