लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘देवमाणूस’ यामालिकेतील शीर्षक भूमिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नाद – द हार्ड लव्ह’ या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आली.

‘नाद – द हार्ड लव्ह’ या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रॉडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केली आहे, तर ‘रांजण’, ‘बलोच’ अशा विविध विषयांवरील आव्हानात्मक चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिंबळे हे कलाकार आहेत. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतो, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरणार आहे.

हेही वाचा >>>पूजा हेगडेनं मायानगरी मुंबईत घेतलं नवं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क

प्रेमकथेचा आधार घेत समाजात घडणाऱ्या काही महत्त्वाच्या घटनांवर प्रकाशझोत टाकणारं कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलं. गुढीपाडव्याचं औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. संतोष दाभोळकर आणि दीपक पवार लिखित कथा, डॉ. विनायक पवार यांची पटकथा व संवादलेखन तर संगीतकार पंकज पडघन यांचं संगीत चित्रपटाला लाभलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First glimpse of kiran gaikwad movie dev manus released amy