‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी अक्षरात कोरलं आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच तानाजी मालुसरे. तानाजींच्या पराक्रमाची कथा ही चित्रपटाच्या रुपात रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार आहे हे स्पष्ट झालं आहे. या चित्रपटातील शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला असून शरद केळकर ही भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाजी महाराजांबरोबरच औरंगजेबचाही फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला असून ही भूमिका एक खास कलाकार साकारणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तानाजी यांची भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगणनेच ट्विटवरुन एक ट्विट करुन शिवाजी महाराज, जिजाऊ आणि औरंगजेब या भूमिकांचे पोस्टर शेअर केले आहेत. प्रत्येक पोस्टरबरोबर त्या भूमिकेच्या तोंडी असणारा एक संवाद अजयने कॅप्शन म्हणून वापरला आहे. ‘पत्थर से ठोकर तो सब खाते है, पत्थर को ठोकर मारे वो मराठा’ अशी ओळ ट्विट करत अजयने शिवाजी महाराजांचा तर ‘जब तक कोंडाणा पे भगवा नही लेहराता हम जुते नाही पेहनेंगे’ हा जिजाऊंचा संवाद शेअर करत त्याने दोन्ही भूमिकांचे फर्स्ट लूक प्रसिद्ध केले आहेत. पद्मवती राव या जिजाऊंच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

मात्र या दोन भूमिकांबरोबरच या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांच्या शत्रूची म्हणजेच औरंगजेबचाही फर्स्ट लूक ही प्रदर्शित करण्यात आला आहे. लूके केनी हा अभिनेता औरंगजेबची भूमिका साकारणार आहे. ‘हम मुक्कमल हिंदुस्तान को फते करने का इरादा रखते है’ हा संवाद कॅप्शनमध्ये शेअर करत अजयने लूकेचा औरंगजेबच्या भूमिकेतील फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. लूके नुकताच ‘सिक्रेड गेम्स’ या वेब सिरीजमध्ये झळकला होता. या वेब सिरिजही त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. २००८ साली लूकेने ‘रॉक ऑन’ या चित्रपटामध्ये गिटारिस्टची भूमिका साकारली आहे. तसेच रेज ऑफ झॉम्बी (२०१३), करीब करीब सिंगल (२०१७) या चित्रपटांमध्येही त्याने भूमिका साकारली होती. सर्वात आधी लूके १९९८ साली ‘बॉम्बे बॉइज’ चित्रपटामध्ये झळकला होता.

‘तानाजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केलं आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच यातील कलाकारांविषयी उत्सुकता निर्माण झाली. तर या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. सैफच्या भूमिकेचाही फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याआधी काही दिवसांपूर्वीच तानाजी यांच्या भूमिकेतील अजयचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. १५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटाच्या निमित्तानं सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First look of aurangzeb mughal emperor from tanhaji the unsung warrior scsg