साधारणतः गेल्या २५-३० वर्षांपासून आम्ही घरी बाप्पा आणतोय. १९८८ साली आम्ही गावच्या घरी बाप्पाचे आगमन केले. पण गेल्या काही वर्षांपासून आम्ही मुंबईत लोअर परेलमध्ये चाळीतल्या घरीच बाप्पाची स्थापना करतो. आमच्या घरी पूर्वी गौरी-गणपती यायचे. पण माझे वडिल वारल्यापासून आम्ही दीड दिवसच गणपती ठेवतो. या दीड दिवसात घरातलं वातावरण अगदी प्रसन्न होतं. बाप्पासाठी विशिष्ट प्रकारचा मोदक आणि सुक्या मेव्याचा प्रसाद आमच्या घरी केला जातो. यंदा बाप्पासाठी काजूचे मोदक करायचे ठरलंय. बाप्पाच्या कृपेने घरात सुख-शांती, वैभव आहे. त्याचमुळे आम्ही दरवर्षी बाप्पासाठी सोन्याचा दागिना बनवतो. बाप्पाची आरासही अगदी साधी आणि केवळ फुलांची केली जाते. यात कुठेही थर्माकॉलचा वापर केला जात नाही. लहानपणी मला सजावट करण्याची खूप आवड होती. पण ही आवड केवळ एक-दीड वर्ष राहिली. त्यानंतर मी पुठ्ठ्यांची सजावट करायला लागलो आणि कालांतराने तेही बंद केलं. गेली १५ वर्षे आम्ही केवळ फुलांची आरास करतो.
मला ट्रेण्डप्रमाणे बाप्पाची मूर्ती आणायला आवडत नाही. आसनावर बसलेली बाप्पाची मूर्तीच मला मोहक वाटते. जय मल्हार किंवा इतर काही ट्रेण्डनुसार बाप्पाची मूर्ती आणली जाते. राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक आणि शिवाजी महाराज त्यांचा देखावा उभं करणं समजू शकतो. मात्र, बाप्पाला वेगळं असं काहीतरी स्वरुप देण्याचा प्रयत्न कसा केला जाऊ शकतो. अर्थात ती प्रत्येकाची भावना आहे. पण बाप्पाच्या वेशभूषा करणं मला तितकसं पटत नाही.
आज जे जे मी लालबागच्या राजाकडे मागितलं ते मला मिळालेलं आहे. त्यामुळे आज जी इतर मंडळ याच्याशी स्पर्धा करतात त्यावर काय बोलाव तेच कळत नाही. दगडूशेठचा गणपती आज गेली कित्येक वर्ष आहे. त्याच्याशी स्पर्धा करून या मंडळांना काय उपयोग होणार? मी अगदी लहान असल्यापासून लालबागच्या राजाला गर्दी पाहतोय. त्यावेळी तिथे पहिला शाइन इट कंपनीचा गेट लावला जायचा. त्यामुळे तेव्हा शाइन इटचा गेट असलेला गणपती अशी ओळख होती. आज राजाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. नवसाची रांग तेव्हाही होती आणि आताही आहे. केवळ ती रांग आता मोठी झालेली दिसतेय.
संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2016 रोजी प्रकाशित
‘लालबागचा राजा, दगडूशेठचा गणपती यांच्याशी तुलना करून काय उपयोग?’
मी लहान असल्यापासून लालबागच्या राजाला गर्दी पाहतोय.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 05-09-2016 at 09:47 IST
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१६ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh festival celebration by actor sushant shelar