Sanju Rathod New Song Shaky : संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ या गाण्याने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. मोठमोठ्या सेलिब्रिटींना सुद्धा या गाण्याची भुरळ पडली होती. सोशल मीडियावर सर्वत्र हे गाणं ट्रेंड करत होतं. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या वरातीत तर सगळे सेलिब्रिटी ‘गुलाबी साडी’ गाण्यावर मनसोक्त नाचले होते.
‘नऊवारी’, ‘गुलाबी साडी’, ‘काली बिंदी’ आता या गाण्यांपाठोपाठ संजू राठोडचं आणखी एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या गाण्याची तुफान चर्चा चालू आहे. संजूच्या नव्या गाण्याचं नाव ‘Shaky’ असं आहे.
संजू राठोड आता नव्याने प्रेक्षकांसाठी काय सादर करणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. अखेर संजूचं नवीन गाणं सर्वत्र प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘Shaky’ या नवीन गाण्याचा लेखक आणि गायक स्वत: संजू राठोड असून, या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे.
संजूच्या नव्या गाण्यात कोणती अभिनेत्री झळकणार याबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. यापूर्वी ‘गुलाबी साडी’ गाण्यात प्राजक्ता घाग झळकली होती. तर, अभिनेत्री आकृती नेगीने ‘काली बिंदी’ गाण्यात भन्नाट डान्स केला होता. आता संजूच्या नव्या गाण्यात हिंदी ‘बिग बॉस’ गाजवणाऱ्या ईशा मालवीयची वर्णी लागली आहे.
ईशा मालवीयचा जबरदस्त डान्स आणि किलर एक्स्प्रेशन्स या गाण्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतात. अवघ्या दोन तासांत या गाण्याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “हे गाणं हिट आहे”, “गाणं सुपरहिट होणार…”, “ईशा मालवीयबरोबर गाणं What A Collab”, “हिट है बॉस”, “ईशा आणि संजू रॉकिंग”, “ब्लॉकबस्टर”, “संजू आणि ईशा ऑन फायर”, “ट्रेंडिंग होणार सगळीकडे”, “एक नंबर संजू दादा” अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून या गाण्याच्या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, ‘गुलाबी साडी’, ‘नऊवारी’ या गाण्यांप्रमाणे संजू राठोडचं नवीन गाणं सुद्धा रेकॉर्डब्रेक्रिंग ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.