बॉलिवू़ड अभिनेता अनिल कपूर यांचा मुलगा आणि अभिनेता हर्षवर्धन कपूरने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हर्षवर्धन हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आता दिवाळीचा सण सुरु आहे. त्यानिमित्ताने बऱ्याच सेलिब्रिटींनी फटाके फोडून प्रदुषण करू नका अशा पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. त्याचप्रमाणे हर्षवर्धनने देखील अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. मात्र, त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

हर्षवर्धनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून फटाके फोडू नका अशा आशयाचे ट्वीट केले होते. ‘लोक अजूनही फटाके फोडत आहे. त्या फटाक्यांमुळे घरातील पाळीव प्राणी घाबरले आहेत, घरातील प्रत्येक व्यक्ती अस्वस्थ आहे. महत्त्वाचं म्हणजे हे पर्यावरणासाठी खरोखरंच वाईट आहे. कधी कधी संस्कृती पेक्षा सामाजिक भान असणे गरजेचे आहे’, असे ट्वीट हर्षवर्धनने केले होते.

आणखी वाचा : “पहिल्याच डेटवर बॉयफ्रेंडने केली शरीरसुखाची मागणी…”, ‘तारक मेहता…’ मालिकेतील अभिनेत्रीने केला खुलासा

आणखी वाचा : “पैसे टाकले म्हणून तिने राज कुंद्राशी लग्न केलं!”; अनिल कपूरच्या विधानावर शिल्पा शेट्टीने दिलं उत्तर, म्हणाली…

हर्षवर्धनचे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एक नेटकरी अनिल कपूर यांचा फटाके फोडतानाचा फोटो शेअर करत त्याला म्हणाला, “दिवाळी २०१६, सोनमच्या डावीकडे उभा असलेला व्यक्ती तूच आहेस का? मग तू तुझ्या वडिलांना फटाके फोडण्यापासून रोखलं का नाही ? तुला आताच का अक्कल आली?” दुसरा नेटकरी म्हणाला, “जर तुम्ही सकाळ, दुपार आणि रात्रीच्या जेवणात मांसाहार करत असाल तर ते पर्यावरणासाठी हानिकारक नाही का? तुम्ही दिवसभर एसी रूममध्ये राहता, ते पर्यावरणासाठी हानिकारक नाही का? मग फक्त दिवाळीच्याच दिवशी सर्व का लक्षात येतं?”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी हर्षवर्धनला ट्रोल केले आहे. ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर हर्षवर्धनने त्याचे हे ट्वीट डीलीट केले.