‘इंदू सरकार’ सिनेमा मागची आणि पर्यायाने दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या मागची संकटं काही केल्या कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. काल पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सिनेमासंदर्भातील एक पत्रकार परिषद होऊ दिली नव्हती. आज सिनेमाची टीम नागपूरला गेली असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी कालचाच कित्ता पुढे गिरवला. आज नागपूरातही मधुर भांडारकर यांच्या विरोधात निदर्शन करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे शेवटी नागपूरातली पत्रकार परिषद रद्द करण्याचा निर्णय मधुर यांनी घेतला. नागपुरात सिनेमाचं प्रमोशन न करताच भांडारकर माघारी परतले.

IIFA Awards 2017 FULL winners list: आयफामध्ये चलती ‘ऐ दिल है मुश्किल’ची

मधुरने याबाबत त्याच्या ट्विटरवरून प्रखर शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी यांना ट्वटिरवर टॅग करत म्हटले की, ‘काल पुण्यानंतर मला नागपुरातही पत्रकार परिषद रद्द करावी लागली. अशासारख्या गुंडगिरीला तुम्ही पाठिंबा देता का? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का?’

मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ या सिनेमाचा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित करण्यात आला त्या दिवसापासूनच या सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. हा सिनेमा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. मात्र या सिनेमात इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि काँग्रेसची बदनामी करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केलाय. शिवाय या सिनेमाला भाजपाकडून पैसे देण्यात आल्याचा दावाही काँग्रेसने केलाय. ज्यामुळे काँग्रेसकडून सिनेमाला विरोध केला जात आहे.

‘इंदू सरकार’ला पुण्यातही काँग्रेस नेत्यांकडून विरोध

काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनीही सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांना दाखवण्याची मागणी सेन्सॉर बोर्डाकडे केली होती. यासंदर्भात निरुपम यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पत्रदेखील लिहिले होते. पण मधुर भांडारकर यांनी प्रदर्शनापूर्वी सिनेमा कोणालाही दाखवण्यास मनाई केली होती. तर दुसरीकडे अलाहाबादच्या एका काँग्रेस नेत्याने सिनेमाचा विरोध करत दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्या चेहऱ्याला काळं फासणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षिस देण्याची घोषणा केली होती.

मधुर भंडारकर दिग्दर्शित या सिनेमात किर्ती कुल्हाडी, नील नितीन मुकेश आणि अनुपम खेर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाला अनेक कारणांमुळे विरोध होत आहे. येत्या २८ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.