बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या आगामी ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. आमिर खानच्या या चित्रपटात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असून त्यासाठी ते दिवसरात्र मेहनतसुद्धा घेत आहे. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होत आहे. ब्लॉगच्या माध्यमातून बिग बी नेहमीच त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. आपल्या व्यग्र कामकाजातून वेळ काढत त्यांनी चाहत्यांसोबत हा एकंदर अनुभव शेअर केला आहे.
‘नव्या पहाटची सुरुवात काही कारणासाठी होते, आणि दिवसही एका कारणाने संपतो. त्या कारणाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता, हे महत्त्वाचं आहे. काल संध्याकाळी शूटिंगला सुरुवात झाली आणि आज सकाळी काम संपलं. जगण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत घ्यावीच लागते,’ असे त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिले.
वाचा : ‘महाभारत’ घडवण्यासाठी आमिरची साथ देणार अंबानी?
या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बिग बींची प्रकृती बिघडली होती. मुंबईहून डॉक्टरांची टीम जोधपूरला रवाना झाली होती. जोधपूरमध्ये चित्रपटाची शूटिंग सुरू होती. यापूर्वीही बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये प्रकृतीविषयी उल्लेख केला होता. ‘काही लोक जगण्यासाठी काम करतात, खूप मेहनत घेतात. उद्या सकाळी डॉक्टरांची टीम माझी तपासणी करेल आणि त्यांच्यामुळे मी पुन्हा काम करण्यासाठी सज्ज होईन. सध्या मी आराम करत आहे पण याविषयी वेळोवेळी माहिती देत राहिन,’ असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी शूटिंगदरम्यान त्यांची प्रकृती बिघडली.
विजयकृष्ण आचार्य दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान, फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ यांच्याही भूमिका आहेत.