निर्माता म्हणून ‘विकी डोनर’ आणि ‘मद्रास कॅफे’ या दोन चित्रपटांद्वारे  बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेला जॉन अब्राहम आता ‘बनाना’ नावाचा चित्रपट घेऊन येत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आश्चर्यचकित आणि भावूक करेल, असे जॉनला वाटते. ‘बनाना’ चित्रपटात जीवनातील पौगंडा अवस्थेपासून ते तारुण्यापर्यंतचा काळ दर्शविण्यात आला आहे. हा चित्रपट  पाहिल्यावर अनेकांना त्यांच्या गतकाळच्या आयुष्यातील गोष्टींना उजाळा मिळण्याची जॉनला खात्री आहे. नव्या दमाचा दिग्दर्शक साजिद अली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, इम्तियाज अलीचा भाऊ साजिद या चित्रपटाद्वारे अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे.
अनिझ बाझमी यांच्या ‘वेलकम’ या २००७ मध्ये आलेल्या चित्रपटाच्या ‘वेलकम बॅक’ या सिक्वलमध्ये जॉन अब्राहम दिसणार आहे. चित्रपटाचे शुटिंग सुरू झाले असून, जानेवारीमध्ये ते पूर्ण होईल. या चित्रपटातील माझी भूमिका खूपच  वेगळी असून, प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्याची उत्सुकता असल्याचे जॉन म्हणाला. याशिवाय ‘दोस्ताना’च्या सिक्वलवर तो काम करीत असून, यात तो अभिषेक बच्चनबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाचा निर्माता करण जोहर असून, लवकरच तो या चित्रपटाची घोषणा करणार आहे.